coronavirus: ठाणे ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 02:39 AM2020-12-10T02:39:29+5:302020-12-10T02:40:40+5:30
Thane coronavirus: ठाणे जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तो वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कंबर कसली.
ठाणे - दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून या आजारातून पूर्णपणे बरे होऊन स्वगृही परतणाऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत घट होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या १८ हजारांच्या वर गेली असून, त्यापैकी १६ हजार ५६२ जण काेरोनामुक्त झाले आहेत. त्यात मागील आठ दिवसांत अवघ्या ९६ रुग्णांची भर पडली असून, एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून जिल्ह्याचे आरोग्य सुधारत असल्याचे दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तो वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कंबर कसली. बाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली होती. मात्र, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागावरील ताण वाढला होता. अशा परिस्थितीतदेखील जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन रुग्णांचे जीव वाचविले. त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात ऑक्टोबरच्या अखेरीस रुग्णांच्या संख्येत होणारी घट, रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण, रुग्णालयातील रिक्त खाटा यांच्या रूपात दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यांतील ग्रामीण क्षेत्रात ३० नोव्हेंबरला १८ हजार १७६ इतकी रुग्णांची संख्या असून, त्यात आठ दिवसांत १६३ नवीन रुग्णांची भर पडल्याने बाधित रुग्णांची संख्या १८ हजार ३६३ वर पोहोचली आहे. तर, या कालावधीत या आजाराने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.