Coronavirus : ठाण्यात विलगीकरण कक्षास पुन्हा विरोध, ठाणे पालिकेसमोर मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 02:00 AM2020-03-17T02:00:40+5:302020-03-17T02:01:03+5:30

कासारवडवलीच्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी बेड आणि इतर साहित्य सोमवारी सकाळी आणायला सुरुवात केली असता, या ठिकाणी अचानक मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. त्यांनी बेड बाहेर काढण्याचेही प्रयत्न केले.

Coronavirus : Opposition to the separation cell in Thane again, a big scuffle in front of Thane municipality | Coronavirus : ठाण्यात विलगीकरण कक्षास पुन्हा विरोध, ठाणे पालिकेसमोर मोठा पेच

Coronavirus : ठाण्यात विलगीकरण कक्षास पुन्हा विरोध, ठाणे पालिकेसमोर मोठा पेच

Next

ठाणे : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी ठाण्यातील श्रीनगर येथे सुविधा भूखंडाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या पाच मजली इमारतीमध्ये २५ खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यास विरोध झाल्यानंतर, आता कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीमध्येही हा कक्ष सुरू करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवल्याने पालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

कासारवडवलीच्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी बेड आणि इतर साहित्य सोमवारी सकाळी आणायला सुरुवात केली असता, या ठिकाणी अचानक मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. त्यांनी बेड बाहेर काढण्याचेही प्रयत्न केले. अखेर, स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर आणि इतर नगरसेवकांनी पालिकेशी संपर्क साधून या ठिकाणी हा कक्ष सुरू न करण्याचा निर्णय घेतला. विलगीकरण कक्ष या ठिकाणी सुरू करणार नसल्याचे लेखी मिळावे, यासाठी हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी निवेदन दिले. या कक्षामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शंका ओवळेकर यांनी व्यक्त केली. नागरिकांचा रोष बघून प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी या ठिकाणी कक्ष सुरू करणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिले.

जनजागृतीचा परिणाम शून्य : आधी श्रीनगर आणि आता कासारवडवलीमध्ये विलगीकरण कक्षास तीव्र विरोध झाल्यानंतर कक्ष कुठे उभारायचा, असा मोठा पेच महापालिकेसमोर उभा झाला आहे. वास्तविक, कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, तर त्याला थेट मुंबईला हलविण्यात येणार आहे. याठिकाणी केवळ संशयित रुग्णांनाच ठेवले जाणार आहे. विलगीकरण कक्ष उभारल्यामुळे या भागात हा आजार बळावेल, असे काहीच नाही. त्यासाठी जनजागृतीही सुरू आहे. मात्र, असे असतानाही नागरिकांनी विरोध करणे अयोग्य आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत असून पालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांतही विलगीकरण कक्षांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. रोझा गार्डनिया येथे नव्याने १५ खाटांच्या विलगीकरण कक्षाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात १६१ विलगीकरण कक्ष

ठाणे : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच काय करावे, काय करू नये, याबाबतच्या सूचनाही सर्वांना दिल्या आहेत. त्यानुसार, त्याचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले. जिल्ह्यात तीन रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून जिल्ह्यात १६१ विलगीकरण कक्ष राखीव ठेवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात केलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून जिल्ह्यात १३६ कक्ष विलगीकरणासाठी राखीव ठेवले आहेत. खाजगी रुग्णालयांत २५ कक्ष राखीव ठेवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्याहीपेक्षा आपण काय काळजी घेतली पाहिजे, त्याला प्रतिबंध कसा करता येऊ शकतो, हेदेखील महत्त्वाचे आहे. गर्दी करणे टाळावे. नियमांचे पालन करावे, जेणेकरून या आजारावर मात करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

आधारवाडी कारागृहातील बंदींचा अन्नत्याग
कल्याण : आधारवाडी कारागृहाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना कोरोनाबाबत काय उपाययोजना केल्या, याची विचारणा करणाºया बंदींना तुम्ही इथेच मरा, असे उत्तर दिल्याने येथील बंदींनी रविवारपासून अन्नपाण्याचा त्याग केला आहे. बंदींचे याबाबतचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
कोरोनाचा धसका कारागृहातील बंदींनीदेखील घेतला आहे. अशातच पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल रविवारी कल्याण जिल्हा कारागृहाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी बंदींनी कोरोनाच्या दृष्टिकोनातून बंदींसाठी कोणते नियोजन केले आहे, अशी विचारणा जैस्वाल यांना केली. त्यावेळी ‘तुम्ही सर्व कैदी मरा’ असे उत्तर त्यांनी दिले.
त्याअनुषंगाने निषेध म्हणून बंदींनी अन्नपाण्याचा त्याग केल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याबाबत, कारागृह अधीक्षक भारत भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Coronavirus : Opposition to the separation cell in Thane again, a big scuffle in front of Thane municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.