coronavirus: अंगणवाडी सुरू करण्याचे आदेश, सेविकांमध्ये कोरोनाची धास्ती, बालकांचे वजन-उंची घेण्यास केला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 01:24 AM2020-07-05T01:24:09+5:302020-07-05T01:24:34+5:30
कोरोनाची रुग्णसंख्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यास वेळीच आळा घालण्यासाठी आता नव्याने लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र,एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रशासनाने अंगणवाडी केंद्रे उघडण्याचे आदेश १ जुलै रोजी जारी केले आहेत.
ठाणे : जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये १० दिवसांसाठी घोषित केलेला लॉकडाऊन विचारात न घेता अंगणवाडी केंद्रे सुरू करून रोज पाच बालकांसह गरोदर व स्तनदा मातांची उंची, वजन घेण्याचे आदेश अंगणवाडीसेविकांना प्राप्त झाले. मात्र, सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचे नियम पाळून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील या सेविकांनी या कामाला विरोध केला आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यास वेळीच आळा घालण्यासाठी आता नव्याने लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र,एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रशासनाने अंगणवाडी केंद्रे उघडण्याचे आदेश १ जुलै रोजी जारी केले आहेत.
सेविकांना कुपोषित बालके शोधणे व नियमित बालकांची, गरोदर, स्तनदा मातांची वजन-उंची घेण्यासाठी ग्रोथ मॉनिटरिंग करण्यासह दैनंदिन गृहभेटी देण्याचे फर्मान काढले आहे. पण, गावकऱ्यांकडून कडक लॉकडाऊन पाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यास अनुसरून सेविकांनी काम करण्यास विरोध दर्शविला आहे.
कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी महाविद्यालये, माध्यमिक, प्राथमिक शाळा बंद ठेवलेल्या आहेत. पण, बालकांची अंगणवाडी केंदे्र सुरू करून एक मीटरचे सामाजिक अंतर ठेवून कामकाज करणे, सॅनिटायझरचा वापर वारंवार करण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु, अंगणवाडी केंद्रांना सॅनिटायझरचा पुरवठा शासनाने केलेला नाही. फक्त ते वापरण्याच्या सूचना कागदोपत्री केल्या आहेत. आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या सेविका सॅनिटायझर व साबणाची खरेदी करण्यास असमर्थ आहेत. प्रशासनाने या वस्तू उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
एकमेकांशी संपर्क येऊ शकतो
अंगणवाडी केंदे्र उघडली व ग्रोथ मॉनिटरिंगचे काम करताना एकमेकांचा संपर्क सेविकांबरोबर येऊ शकतो. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यास अनुसरून सेविकांनी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काम करण्यास विरोध दर्शविला असून तसे प्रशासनास निवेदनाद्वारे सूचित केले आहे, असे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी भगवान दवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.