CoronaVirus : नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश, शहरात पाच बार सील, महापालिकेची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 01:38 PM2021-02-23T13:38:27+5:302021-02-23T13:38:59+5:30
CoronaVirus in Thane : महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
ठाणे : सोशल डिस्टसिंग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन लेडीज बारसह एकूण पाच रेस्टॅारंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करूत ते पाचही बार काल रात्री उशीरा सील केले. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने धाडी टाकून ही कारवाई केली.
या कारवाईतंर्गत नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत दोन लेडीज बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली. नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा लेडीज बार उपायुक्त(अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला.
याचबरोबर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडू येथील सन सिटी या लेडीजबारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बार उपायुक्त(अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले.
दरम्यान, या पाचही आस्थापनांवर महापालिका आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशारा महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिला आहे.