coronavirus: मीरा-भाईंदर मधील फेरीवाल्यांनी व्यापलेली गर्दीची ठिकाणे नियंत्रणाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 12:41 PM2021-04-05T12:41:10+5:302021-04-05T12:41:47+5:30
coronavirus in Mira Bhayander : मीरा भाईंदर मध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून त्याठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यात महापालिका , पोलिसांसह स्थानिक नगरसेवक अपयशी ठरले आहेत .
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून त्याठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यात महापालिका , पोलिसांसह स्थानिक नगरसेवक अपयशी ठरले आहेत . फेरीवाल्यांचे बाजार , खाद्य पदार्थांच्या गाड्यांवरील गर्दी कोरोना संसर्ग वाढीला मोठे कारण मानले जात असताना देखील अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने ठोस कारवाई केली जात नाही .
मीरा भाईंदर मध्ये फेरीवाले आणि खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्यां वर मोठे अर्थचक्र चालत असते . फेरीवाले जेवढे तेवढे बाजार वसुली करणाऱ्या ठेकेदारांचे उखळ पांढरे होते . शिवाय पालिका प्रशासनासह स्थानिक नगरसेवक - राजकारण्यांचे अर्थपूर्ण लागेबांधे फेरीवाले वाढवण्यास कारणीभूत ठरले आहेत .
फेरीवाल्यां विरोधात आधी बोंब करायची मग वजन वाढवून चिडीचूप व्हायचे असा नगरसेवकाचा किस्सा सुद्धा चर्चेत आहे . फेरीवाल्यांच्या हातगाड्या सुद्धा भाड्याने देणारी टोळी आहे . साहजिकच प्रचंड आर्थिक फायद्याच्या ह्या फेरीवाल्यां कडे चराऊ कुरण म्हणून पहिले जात असल्याने शहरात फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरले आहे .
रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर तर शैक्षणिक संस्था , धार्मिक स्थळं , रुग्णालय परिसरात १०० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे . परंतु तेथे सर्रास फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे . पालिकेच्या ना फेरीवाला क्षेत्रात तर फलकां खालीच पालिकेच्या नाकावर टिच्चून फेरीवाले बसत आहेत . वाहतुकीची कोंडी आणि पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा गंभीर झाली असताना फेरीवाल्यानाच पाठीशी घातले जाते .
कोरोनाचा संसर्ग एकीकडे पसरत असताना फेरीवाले सुद्धा प्रचंड पसरले आहेत . बहुतांश फेरीवाले हे मास्क न घालताच असतात . अनेकजण नाका - तोंडा खाली मास्क ठेवतात . त्यांचे कडे सॅनिटायझर नसते . फेरीवाल्यांच्या ठिकाणी सतत लोकांची गर्दी होत असते . मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना सुद्धा ते रोखत नाहीत.
रस्ते - पदपथ वर बसणारे फेरीवाल्यांच्या भाजी व अन्य विक्रेत्यां कडे जशी गर्दी असते तशीच गर्दी खाद्यपदार्थ विक्रेत्या हातगाड्यांवर दिसते . तेथे तर खाण्यासाठी लोकं गर्दी करतात आणि बराच वेळ विना मास्क गर्दी करून एकमेकांच्या संपर्कात राहतात .
शहरात बेकायदेशीर आठवडे बाजार सुद्धा जोरात चालतात. भाईंदर रेल्वे स्थानका जवळ भल्या पहाटे भरणारा मासळी बाजार असो कि भाईंदरच्या डॉ . आंबेडकर ६० फुटी मार्ग , भाईंदर पूर्व खारीगाव , मीरारोड स्थानक येथे पहाटे भरणारा भाजीचा घाऊक बाजार सुद्धा गर्दीने फुललेला असतो . मास्क न घालणे हे तर नित्याचेच असते.
रहदारीला व पादचाऱ्यांना नेहमीच वेठीस धरणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांनी आता कोरोना संसर्ग रोखण्याच्या नियम निर्देशांचे सुद्धा उघड उघड उल्लंघन चालवले आहे . परंतु फेरीवाल्यांच्या अर्थचक्रात स्थानिक नगरसेवक , पालिका प्रशासन , बाजार वसुली ठेकेदार आणि संरक्षणकर्ते अश्या संगनमताच्या चक्रात कोरोना संसर्ग सुद्धा वाढीस लागण्याची भर पडली तर आश्चर्य वाटायला नको अशी स्थिती आहे.