CoronaVirus: वारली चित्रशैलीत कोविडचा वैश्विक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 12:28 AM2020-04-25T00:28:01+5:302020-04-25T00:30:08+5:30

अनिल वांगड यांचे चित्र; ठळक घडामोडी चितारल्या, साठ टक्के रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीला देणार

CoronaVirus painter makes warli style painting to show global journey of covid 19 | CoronaVirus: वारली चित्रशैलीत कोविडचा वैश्विक प्रवास

CoronaVirus: वारली चित्रशैलीत कोविडचा वैश्विक प्रवास

Next

- अनिरुद्ध पाटिल

बोर्डी : कोविड-१९ ने जगातील बहुतांशी देशांना विळख्यात घेतले असून आतापर्यंत लाखो लोकांनी प्राण गमावले आहेत. या विषाणूच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे झालेले परिणाम तसेच भारताने अवलंबिलेले तंत्र, या दरम्यान घडलेल्या ठळक घडामोडींचे वर्णन डहाणूतील गंजाड येथील जागतिक दर्जाचे वारली चित्रकार अनिल चैत्या वांगड यांनी चितारले आहे. या चित्राची विक्री दीड लाख रुपयांना केली जाणार असून त्यापैकी साठ टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असल्याची माहिती वांगड यांनी दिली.

डहाणूतील गंजाड या गावाला पद्मश्री कै. जिव्या सोमा म्हसे यांच्या योगदानामुळे वारली चित्रशैलीचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचा हा समृद्ध वारसा त्यांचे शिष्य अनिल चैत्या वांगड हे चालवीत आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन विविध देशात लावले जात असून तेथे त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. पारंपरिक विषयांसह आधुनिक घडामोडींना या चित्रशैलीत स्थान मिळाले आहे. कोविड-१९ हा विषय वांगड यांनी वारली चित्रातून दाखवला आहे. त्यांनी ५२ बाय ६२ इंच आकाराच्या कॅनव्हासवर २२ मार्च ते लॉकडाऊनचा दुसरा टप्पा या दरम्यान जागतिक स्तरावर या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घडलेल्या घटनांना मूर्त रूप दिले आहे.

तंत्रज्ञानाच्या वापरापूर्वी आणि औद्योगिक क्रांतीमुळे सर्वच देशातील आमूलाग्र बदल, त्यानंतर चिनी ड्रॅगन दाखवून वुहान येथे प्रथम कोरोनाचा प्रादुर्भाव, इटली, स्पेन, फ्रान्स (आयफेल टॉवर) अशा विविध देशांचे लँडमार्क दाखवून तेथे विषाणूचा संसर्ग, जीवित व वित्तहानीचे वर्णन चित्रातून रेखाटले आहे.
भारतात या विषाणूचा फैलाव दाखवताना जनता कर्फ्यू, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा उल्लेख आहे. या मोहिमेत कर्तव्य बजावणाºया आरोग्य कर्मचारी, पोलीस या विभागांच्या कार्याचा गौरव टाळ्या, घंटानादाने करण्याचे पंतप्रधानांनी देशवासीयांना केलेले आवाहन, त्याला जनतेचा मिळालेला प्रतिसाद, लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेली रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, ठिकठिकाणी स्थानबद्ध झालेले नागरिक, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, भोजन वाटपाकरिता पुढे आलेले हात, पर्यटनासह अन्य व्यवसायावर झालेला परिणाम, संसर्ग झालेल्या रुग्णांचे ‘क्वारंटाईन’ तसेच दवाखान्यातील उपचार, त्यानंतर पूर्ण बरे झालेले रुग्ण या विविध घडणाºया घटनांची प्रसारमाध्यमातून माहिती घेऊन ती चित्रातून मांडण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन केल्याने अन्य देशांच्या तुलनेत भारताने या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात बºयाच
प्रमाणावर यश मिळविले आहे. लॉकडाउन हाच या रोगावर एकमेव उपाय असून त्यामुळे रोगाचा अंत झाल्याचा आशावाद त्याचा विषाणूचा आकार लहान-लहान करून दाखवला आहे. आधुनिक जगाचे वर्णन असले, तरी हे चित्र पारंपरिक वारली चित्रशैलीत काढले आहे. हे चित्र पूर्ण झाले असून त्याची विक्री दीड लक्ष किमतीला केली जाईल, अशी माहिती दिली.

कोरोना या महामारीचा चीन येथे झालेला प्रारंभ, विविध देशात झालेला परिणाम, भारतातील घडामोडी इ. वर्णन वारली चित्रशैलीत चितारले आहे. त्याची किंमत दीड लक्ष इतकी असून त्याची विक्री झाल्यास ६० टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे.’
- अनिल चैत्या वांगड, वारली चित्रकार,
डहाणू (गंजाड)

Web Title: CoronaVirus painter makes warli style painting to show global journey of covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.