coronavirus: भीती अन् धास्तीच्या वातावरणात रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 02:52 AM2020-05-12T02:52:35+5:302020-05-12T02:53:00+5:30
सुरक्षिततेच्या दृष्टीने वापरण्यात येणारे पीपीई किट काढल्याशिवाय पाणीदेखीलही पिता येत नाही. मात्र, या संकटातही रुग्णालय प्रशासन आमची वेळोवेळी काळजी घेत असल्याच्या भावना परिचारिकांनी जागतिक परिचारिका दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतजवळ व्यक्त केल्या.
- पंकज रोडेकर
ठाणे - ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्य बजावताना, प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाजवळ जावे लागते. त्यावेळी मनात एक प्रकारे भीती असते. आपल्यामुळे घरच्यांना लागण तर होणार नाही ना, अशी मनात धास्ती असते. परंतु, रुग्ण हे शिकलेले असल्याने त्यांच्याकडून आणि घरच्या मंडळींकडून सहकार्य मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने वापरण्यात येणारे पीपीई किट काढल्याशिवाय पाणीदेखीलही पिता येत नाही. मात्र, या संकटातही रुग्णालय प्रशासन आमची वेळोवेळी काळजी घेत असल्याच्या भावना परिचारिकांनी जागतिक परिचारिका दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतजवळ व्यक्त केल्या.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले गेले. येथे परिचारिकांनी सात दिवस ड्युटी केल्यावर सात दिवस सुटी मिळू लागली. त्यांना घरी जाणे शक्य नव्हते, त्यांची रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली गेली. पण, जे घरी जातात, त्यांच्यामुळे घरातील मंडळींना लागण होऊ नये, याबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. कुटुंबासोबत असून त्यांच्यात सहभागी होता येत नाही. कुणाशीही बोलताना तीन ते चार फुटांचे अंतर ठेवावे लागते. रुग्णालय प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जाते. प्रोटिनयुक्त आहार देण्याबरोबर पुरेसा आराम करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात असल्याचे परिचारिकांनी सांगितले.
दृष्टिकोन बदलला
महामारीच्या सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. त्यातून काही आरोग्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. पोलिसांचे सहकार्य लाभल्याने आता रुग्णालयातील कोणालाही असा त्रास होत नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर ड्युटी केल्यावर आठवडाभर सुटी मिळत आहे. त्या दिवसांत कुटुंबासोबत असताना त्यांच्यामध्ये सहभागी होता येत नाही, याचे दु:ख वाटते. पण, ते दु:ख त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या तुलनेत महत्त्वाचे नाही. ही जागतिक महामारी लवकरात लवकर संपवावी, असे आता वाटत आहे.
- अनुराधा देशमुख
रुग्णालय आणि कुटुंब सांभाळताना धावपळ होते. त्याला पर्याय काढून घरातील कामाचे वर्गीकरण केले गेले आहे. अत्यावश्यक सेवेत असल्याने आणि त्यातच रुग्णालयाची अधिसेविका यासारख्या मोठ्या पदावर असल्याने घरच्यांचे सहकार्य वेळोवेळी मिळत आहे. त्यांच्या सहकार्याने घरातील व इतर कामेही सुरळीत होत आहेत.
- प्रतिभा बर्डे