coronavirus: रुग्णांचा आलेख येतोय खाली, विपीन शर्मा यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 12:58 AM2020-12-06T00:58:21+5:302020-12-06T00:59:09+5:30
coronavirus News: गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे, परंतु असे असले, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे.
ठाणे - गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे, परंतु असे असले, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. उलट गेल्या काही दिवसांत ऑगस्ट महिन्यापेक्षाही रुग्णांची संख्या कमी असल्याने येत्या आठवडाभरात पॉझिटिव्हिटी रेट हा सात टक्क्यांपेक्षाही कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केला, परंतु सिरो सर्व्हेबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून रुग्णांची संख्या आणखी कशी नियंत्रणात येईल, यावरच सुरुवातीपासून भर दिला जास्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळी सणानंतर इतर राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर पुन्हा लॉकडाऊन होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ठाण्यात टेस्ट करण्याचे प्रमाण हे दररोज पाच हजारांच्या वर असूनही पॉझिटिव्ह येणाऱ्याचे प्रमाण हे दोन टक्के इतके आहे. ते सध्या तरी स्थिर असल्याने ठाण्यात दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. शर्मा यांनी आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर ऑगस्टपर्यंत केवळ कोरोनावर नियंत्रण ठेवणे, तसेच इतर महापालिकांच्या तुलनेत सर्वाधिक टेस्टवर भर दिला असल्याने ठाण्यात आजघडीला कोरोना नियंत्रणात आहे.
ठाण्यात मे महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट १४.९० टक्के होता. त्यानंतर हा आलेख सतत उंचावतच होता. जूनमध्ये १९.४१ टक्के तर जुलैमध्ये २०.८४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. मात्र, जुलैमध्येच शर्मा यांनी टेस्टिंगवर भर देऊन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यानंतर जुलैमध्ये असलेला २०.८४ टक्के पॉझिटिव्हिटी रेट डिसेंबर महिन्यात ७.६२ टक्क्यांवर आला असून, आठवडाभरात तो ७ टक्क्यांपेक्षाही कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.