Coronavirus: डिस्चार्जनंतरही ४० दिवस ठेवला जातो रुग्णांचा ट्रॅक; रुग्णांच्या लुटीला बसला लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:36 AM2020-10-16T01:36:24+5:302020-10-16T01:36:41+5:30
ठाणे महापालिकेचा उपक्रम : महापालिका हद्दीत एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा कहर होता.
ठाणे : कोरोनाचा रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याचा ट्रॅक ४० दिवस ठेवला जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. कोणता रुग्ण कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती दिवसांपासून दाखल आहे, याची माहितीही घेतली जात असल्याने कोविड हॉस्पिटलकडून जी सर्वसामान्य रुग्णांची लूट होत होती, तिलाही लगाम बसला असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
महापालिका हद्दीत एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा कहर होता. ठाण्यात परिस्थिती अशी होती की, रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिकादेखील उपलब्ध होत नव्हती. यामुळे रुग्णालयात वेळेवर पोहोचू न शकल्यानेदेखील अनेकांचा या कालावधीत मृत्यू झाला. रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना बेडदेखील उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. यामुळे पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील जास्तीतजास्त नागरिकांना शोधून त्यांना क्वारंटाइन करणे, या कालावधीत प्रशासनाला शक्यच नव्हते.
मात्र, जूनमध्ये डॉ. विपिन शर्मा यांनी पालिका आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर एकाही रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही तसेच सर्वांना वेळेवर उपचार मिळावे, याची विशेष दक्षता घेतली. यामुळे आता ठाण्यात पॉझटिव्ह दर हा पाच टक्क्यांवर आला आहे.
असा ठेवला जातो ट्रॅक
एखाद्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर ४० दिवसांपर्यंत त्याचा ट्रॅक ठेवून त्याची नियमितपणो चौकशी केली जाते. तो आणखी कोणाच्या संपर्कात आला का, याचीदेखील माहिती घेतली जात असून दुसरीकडे १० दिवस त्यानंतर ११ ते १५ दिवस, २१ ते ३० दिवस आणि ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस अशा टप्प्यांमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचीदेखील नियमितपणो चौकशी केली जाते. जर रुग्ण जास्त दिवस उपचार घेत असेल, तर रुग्णालयाला त्याची कारणोदेखील विचारली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.