coronavirus: कोरोना अहवाल येण्यापूर्वीच जाताहेत रुग्णांचे प्राण, तीन ते पाच दिवसांचा लागतो कालावधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 12:27 AM2020-07-09T00:27:09+5:302020-07-09T00:28:10+5:30
खाजगी लॅबकडून तुलनेने लवकर अहवाल येत असला, तरी सर्वसामान्यांना खाजगी लॅब परवडणा-या नसल्याने ते महापालिकेच्या यंत्रणेकडून कोरोना चाचणी करीत आहेत. परंतु, अहवाल येण्यास पाच दिवसांचा अवधी लागत आहे.
- अजित मांडके
ठाणे : ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने चाचण्या करणाऱ्या लॅबवरील कामाचा ताण कमालीचा वाढल्याने रिपोर्ट येण्यास तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागत असून काही प्रकरणांत रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे.
खाजगी लॅबकडून तुलनेने लवकर अहवाल येत असला, तरी सर्वसामान्यांना खाजगी लॅब परवडणा-या नसल्याने ते महापालिकेच्या यंत्रणेकडून कोरोना चाचणी करीत आहेत. परंतु, अहवाल येण्यास पाच दिवसांचा अवधी लागत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील खाजगी लॅबवरील ताणही वाढत असून कमी मनुष्यबळात त्यांना कामे करावी लागत आहेत. शासनाने निश्चित केलेले दर खाजगी लॅबकडून आकारले जात आहेत.
महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी कोरोना चाचण्या वाढवण्याचे आवाहन केले आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही आणि चाचणीचा अहवाल लवकर मिळत नाही. शहरातील एकही खाजगी रुग्णालय कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असल्याखेरीज संशयित रुग्णाला दाखल करून घेत नाही. अन्य रुग्णालये तर संशयित रुग्णाला उभेही करीत नाहीत. पाच दिवस कोरोनाची लक्षणे दिसूनही त्यांना उपचार न मिळाल्यामुळे काहींचे मृत्यू झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अशा एका रुग्णाचा मृत्यू झाला. १ जुलै रोजी त्याने कोरोना चाचणी केली होती. परंतु, त्यानंतर त्याला अधिकचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात हलविण्यासाठी नातेवाईकांनी धावपळकेली. परंतु, त्याच्याकडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नसल्याने एकाही रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले नाही. त्याचा रिक्षातच तडफडून मृत्यू झाला.
शहरात असलेल्या एका मोठ्या लॅबमध्ये दिवसाला एक हजारांच्या आसपास कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. इतर लॅबमधील हे प्रमाण दिवसाला १०० ते २०० इतके आहे. परंतु, या ठिकाणीदेखील कामाचा ताण अधिक असल्याने एक ते दोन दिवसांत अहवाल रुग्णाला दिला जात आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने काही लॅबने कोणी काम करण्यास इच्छुक असेल, तर त्यांच्यासाठी प्रतिदिन एक हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. काही कर्मचारी घरी जाऊन तपासणी करण्याला घाबरत आहेत, तर काही घरी रुग्ण आढळल्याचे कारण देऊन कामावर येत नाहीत. त्यामुळे जे मनुष्यबळ आहे, त्यावरच काम करण्याची वेळ या लॅबवर आली आहे. त्यामुळेदेखील अहवालास विलंब होत आहे.
डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कोरोना चाचणी केली जात नव्हती. आता नव्या नियमानुसार एखाद्याला कोरोनाची काही लक्षणे दिसत असतील, तर तो तसे सांगून चाचणी करून घेऊ शकतो, असे खाजगी लॅबचालकांनी स्पष्ट केले. परंतु, प्रत्येकाला खाजगी लॅबमध्ये चाचणी शक्य होत नसल्याने तो पालिकेच्या यंत्रणांकडे धाव घेत आहे. त्यांच्याकडून अहवाल येण्यास पाच दिवसांचा कालावधी लागतो परंतु, आम्ही २४ तासांत अहवाल देतो, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
खाजगी लॅबचे दर स्थिर
राज्य शासनाने कोरोना चाचणीकरिता खाजगी लॅबसाठी जे दर निश्चित केले आहेत, त्यानुसारच २८०० रुपये ठाण्यात आकारले जातात. जरी घरी जाऊन स्वॅब घेतला, तरी त्यासाठी तेवढेच पैसे आकारले जात आहेत. रुग्णालयातून रुग्णांचा स्वॅब आल्यास त्यासाठी २२०० रुपये आकारले जातात. मात्र, ठाण्यात टोकनपद्धतीचा अवलंब केला जात नाही.
आमच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. परंतु, उपलब्ध मनुष्यबळावर आम्ही काम करून रुग्णाला लवकरात लवकर म्हणजे २४ तासांत चाचणी अहवाल देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- सचिन भोळे, खाजगी लॅबचालक
कामाचा ताण आहेच, परंतु आम्ही २४ तासांत रुग्णांना चाचणी अहवाल देत आहोत. आमच्याकडे दिवसाला १०० ते २०० कोरोना चाचण्या होत आहेत.
- उल्हास वैद्य,
खाजगी लॅबचालक
खाजगी लॅबचालकांसाठी दर निश्चित करण्यात आलेले आहेत, त्यानुसारच ते दर आकारत आहेत. लवकरात लवक र अहवाल दिले जावेत, असे सांगण्यात आले आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका