Coronavirus: संभाव्य कोरोनाबाधित रुग्णांना पावभाजीचा आस्वाद; ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 08:37 PM2020-06-16T20:37:42+5:302020-06-16T20:38:00+5:30
हॉराईझन स्कुल आणि भाईंदरपाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटरमधील प्रकार
ठाणे : कोरोना लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना संसर्ग टाळण्यासाठी किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना महापालिकेच्या वतीने होराइझन स्कुलमध्ये ठेवले गेले आहे. त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून त्यांना भात, डाळ, भाजी, चपाती असा जेवणाचा मेन्यू देणे अपेक्षित असतांना चक्क त्यांना सोमवारी रात्रीच्या जेवणात तीन पाव आणि भाजी असा मेन्यू देण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पालिकेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.
ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना होराइझन स्कुल आणि भाईंदरपाडा येथे ठेवत आहेत. तसेच या ठिकाणी आणखी काही खोल्यांमध्ये लक्षण नसलेल्या कोरोना बाधीत रुग्णांनाही ठेवले गेले आहे. आधीच येथे सोई सुविधांची वाणवा असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. आता देखील भाईंदर पाडा येथील क्वॉरान्टाइन सेंटरमधील असुविधांचा व्हिडीओ वायरल झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी होराइझन स्कुलमध्ये जाऊन येथील रुग्णांची विचारपूस केली होती. तोपर्यंत सर्व सोयी चांगल्या प्रकारे पुरविल्या जात होत्या. परंतु आता मात्र सोईसुविधांची तर वाणवा आहेच, शिवाय सोमवारी रात्री तर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
येथील रुग्णांना पोष्टीक अन्न देण्याऐवजी पाव भाजीचा मेनु देण्यात आला. त्यातही अवघे तीन पाव भाजीबरोबर देण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचे पोटही भरले नाही. त्यामुळे काहींनी या मेनुचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडियावर वायरल केला आहे. यावरुन आता भाजपने पुन्हा एकदा तोंडसुख घेत, महापालिका प्रशासन आणि शिवसेनेवर टिका केली आहे. पाव भाजी मेनु देऊन जर कोरोना बाधीत रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढत असेल तर आनंदच आहे, असा उपरोधीक टोला भाजपचे जेष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लगावला आहे.