Coronavirus: वेतन वेळेवर द्या, कोविड योद्धे म्हणून लढाईला तयार; गृहरक्षक दलाच्या जवानांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 11:46 PM2020-07-03T23:46:13+5:302020-07-03T23:46:29+5:30
५० वर्षांपुढील जवानांनीही दाखविली तयारी, बंदोबस्तामध्ये योगदान
जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सध्या ५०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना बळ देण्यासाठी आम्ही कोविड योद्धे म्हणून लढण्यासाठी तयार आहोत. फक्त आमचे वेतन वेळेत मिळावे तसेच गेल्या काही महिन्यांपासून बाकी असलेले वेतनही किमान मिळावे. तसेच श्रीमलंग बंदोबस्ताचे सुमारे ६०० जवानांचे थकित वेतनही तातडीने द्यावे, अशी मागणी ठाण्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांनी केली आहे.
प्रत्येक मोठ्या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या बरोबरीने गृहरक्षक दलाचे महिला आणि पुरुष जवान हे योगदान देत असतात. यामध्ये दिवाळी, गणेशोत्सव, बकरी ईद, निवडणूका किंवा आता कोरोनासारखा लढा असो या सर्वच बंदोबस्तासाठी गृहरक्षक दल अर्थात होमगार्डस्चे जवान कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मात्र ५० पेक्षा अधिक वयाच्या गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना ड्युटी नाकारली जात आहे. कंटेनमेंट झोन किंवा नाक्यावरील बंदोबस्तासाठी पोलिसांचे संख्याबळ हे अपुरे पडत आहे.
त्यामुळे या गृहरक्षक दलाच्या जवानांचे संख्याबळ आणि इच्छा असूनही त्यांना हे बंदोबस्त दिले जात नाही. त्यामुळे घरी बिनपगारी राहिल्यामुळे घर चालवायचे कसे? या प्रश्नामुळेही त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यामुळे ज्यांची प्रकृती चांगली असेल आणि इच्छा असेल त्यांना हे बंदोबस्त दिले जावेत. आम्ही कोविड योद्धे होण्यास तयार आहोत. फक्त वेळेवर मानधन दिले जावे, इतकीच अपेक्षा असल्याचे मत ठाण्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांनी व्यक्त केले आहे. मात्र, गृहरक्षक दलाच्या ठाण्यातील कार्यालयातून बंदोबस्ताची यादी काढणारे तसेच काही कार्यालयीन वरिष्ठ अधिकारी मात्र, अगदी गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचाऱ्यांशीही उद्धटपणे वर्तन करतात. यावरूनही या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीमलंग गडावर बंदोबस्त केलेल्या गृहरक्षक दलातील ६०० जवानांचे वेतनही थकविले आहे. तेही तातडीने देण्याची मागणी या जवानांनी केली आहे. याबाबत प्रशासन आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
केवळ हाजीमलंग बंदोबस्ताचे वेतन बाकी आहे. तेही लवकरच मार्गी लागेल. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणेच कोरोनामुळे संपूर्ण राज्यभरात ५० नव्हे तर ४५ पेक्षा अधिक वयोगटातील कर्मचाºयांना बंदोबस्त दिला जात नाही. यात थेट आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे हा धोका पत्करला जात नाही. कालांतराने परिस्थितीनुसार नियमावलीत बदल झाल्यास त्याबाबतचा विचार होऊ शकतो. - संजय पाटील, जिल्हा समादेशक, गृहरक्षक दल, ठाणे