coronavirus: प्रकाशकांचा ई-दिवाळी अंकांवर भर, कोरोनामुळे प्रकाशकांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:55 AM2020-07-11T01:55:57+5:302020-07-11T01:56:17+5:30
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशकांनी छापील दिवाळी अंकाबरोबर डिजिटल म्हणजेच ई-दिवाळी अंकावरही भर दिला आहे.
ठाणे : दिवाळीत वाचकांना बौद्धिक मेजवानी मिळावी म्हणून दिवाळी अंक प्रसिद्ध होत असतात. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशकांनी छापील दिवाळी अंकाबरोबर डिजिटल म्हणजेच ई-दिवाळी अंकावरही भर दिला आहे. काही प्रकाशक आॅडिओ दिवाळी अंक ही संकल्पनादेखील अमलात आणण्याच्या विचारात आहेत.
जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे सध्या सारेच काही बदलले आहे. यामुळे आता डिजिटलचा पर्याय समोर आला आहे. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची सांस्कृतिक/ साहित्यिक परंपरा आहे. ती अखंडपणे सुरू आहे. दिवाळी जवळ आली की, वाचकांना दिवाळी अंकांचे वेध लागतात. अनेक प्रकाशन संस्थांचा ते काढण्याकडे कल असतो. महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास ३५० हून अधिक दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. सध्या कोरोनामुळे सगळीकडे अनिश्चितता आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख दिवाळी अंक सोडले, तर काही अंक छापले जातील की नाही, अशी शंका प्रकाशकांनी व्यक्त केली आहे. वितरण, जाहिराती या साऱ्यांचाच मोठा प्रश्न आहे. तरीही, महाराष्ट्रातील प्रमुख प्रकाशक दिवाळी अंक प्रकाशित करण्यावर ठाम आहेत, पण त्याचबरोबर आर्थिक गणितं पाहता अंकांची पाने कमी केली जातील, छापील प्रतींची संख्याही कमी केली जाणार आहे. परंतु, जास्तीतजास्त वाचकांपर्यंत ते पोहोचावेत, यासाठी ते ई-दिवाळी अंकांवर भर देणार आहेत.
आमचे दोन्ही दिवाळी अंक हे छापील स्वरूपात प्रसिद्ध करणार आहोत, पण ई-दिवाळी अंकाचाही विचार होईल. कुरिअर, पोस्ट सेवा सध्या नीट सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्यांना छापील लागतात, त्यांना छापील अंक दिले जातील. जाहिरातीही कमी होतील, त्याचे विचार करून नियोजन केले जाईल. तरीही, महाराष्ट्रात नामवंत दिवाळी अंक प्रकाशित होतील, असे वाटते.
- अशोक कोठावळे, संपादक/ प्रकाशक
छापील स्वरूपातील अंकांबरोबर आमचा यंदा डिजिटलवरही भर असेल. प्रकाशन संस्थांचा व्यवसाय कोलमडला आहे. दिवाळी अंकांचा प्रचार नीट झाला, तर विक्री होऊ शकते. यंदा जाहिरातीही मिळणार नाहीत. त्यामुळे प्रती कमी छापणार आणि पानांची संख्याही कमी असेल. तसेच, ई-अंक हा कमीतकमी किमतीत देऊन जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोहोचविणार. ई-दिवाळी अंकाबरोबर आॅडिओ दिवाळी अंकाचाही विचार आहे.
- निलेश गायकवाड, प्रकाशक
यंदा दिवाळी अंकांना जाहिरात मिळणार नाही. त्यामुळे ते प्रसिद्ध करू की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
- बाळ कांदळकर, संपादक
ई-दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे. प्रती, पानांची संख्या कमी होईल. जाहिराती कमी मिळतील किंवा मिळणारच नाही, पण अंक प्रकाशित करणार हे नक्की.
- मोनिका गजेंद्रगडकर, संपादिका