CoronaVirus डोंबिवलीतील रुग्णालयातून पळाला क्वॉरंटाइन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 06:12 AM2020-04-06T06:12:44+5:302020-04-06T06:13:17+5:30
शास्त्रीनगरमधील घटना : बाधिताच्या आला होता संपर्कात
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पश्चिमेतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोनाचा एक संशयित रुग्ण शनिवारी रात्री पळून गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला रुग्णालयात क्वॉरंटाइन करण्यात आले होते.
कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अनेक रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. शास्त्रीनगर हे आयसोलेशन रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. तेथे काही संशयितांवर उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयात शुक्रवारपासून कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. यात एक १७ वर्षांचा मुलगाही होता. मात्र, शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास बाथरूमला जाण्याचा बहाणा करून तो खिडकीतून उडी मारून पळून गेला. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने विष्णूनगर पोलिसांना दिली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याने तो पळून गेल्याची चर्चा आहे.
तरुण पळून गेल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयाच्या सर्व खिडक्या बंद करण्याच्या सूचना दिल्याचे शास्त्रीनगर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.