CoronaVirus News: रुग्ण बाधित होण्याच्या दरात घट; अंबरनाथमधील दिलासादायक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:52 AM2020-10-10T00:52:47+5:302020-10-10T00:52:54+5:30

पालिका प्रशासनाने राबविल्या विविध उपाययोजना

CoronaVirus Reduction in patient incidence rates; Comfortable picture in Ambernath | CoronaVirus News: रुग्ण बाधित होण्याच्या दरात घट; अंबरनाथमधील दिलासादायक चित्र

CoronaVirus News: रुग्ण बाधित होण्याच्या दरात घट; अंबरनाथमधील दिलासादायक चित्र

Next

अंबरनाथ : शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी, याकरिता पालिका प्रशासनामार्फत विविध पातळ्यांवर योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात ५१.२९ टक्के असलेला रुग्ण बाधित होण्याचा दर हा कमी होऊन आॅक्टोबरमध्ये २६.४६ टक्क्यांवर आला आहे.

शहरात एकूण २५ हजार ११७ चाचण्या करण्यात आल्या असून बाधित रुग्णांची संख्या आजवर सहा हजार ६४७ एवढी झाली आहे. त्यातील सहा हजार १९ रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात सर्व नागरिकांचे झालेले प्राथमिक आरोग्य सर्वेक्षण, त्यामुळे बाधितांची वेळीच झालेली ओळख आणि त्यांना योग्य वेळी मिळालेले उपचार यामुळे शहराचा रुग्ण बाधित होण्याचा दर हा निम्म्यावर आला आहे. यामुळे शहराच्या दृष्टीने ही एक सकारात्मक बाब आहे. सद्य:स्थितीत शहरात एकूण रुग्णसंख्येपैकी ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे आजवर आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी केवळ ५.८३ टक्केच रुग्ण आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा ९०.५५ टक्के इतका आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील रुग्णालयात लवकरच ५०० आॅक्सिजन बेडची सुविधाही करण्यात येत आहे, जेणेकरून सध्या उपचार घेत असलेले आणि भविष्यात रुग्णालयात नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांना आॅक्सिजनअभावी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. त्याचबरोबर सध्या या रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची असून तीही वाढवून ७०० खाटांपर्यंत वाढवण्यात येत आहे.

रुग्णांना मिळाले वेळेत उपचार
कोरोना नियंत्रणात यावा, याकरिता पालिका प्रशासनाकडून वाढविलेले चाचण्यांचे प्रमाण, अ‍ॅण्टीजेन चाचण्यांवर दिलेला भर, बाधित रुग्णांना वेळीच मिळालेले उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे आणि त्याचबरोबर शहराचा रुग्ण बाधित होण्याचा दरदेखील कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

भिवंडीत एक लाख ६४ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण
भिवंडी : कोरोनावर उपाययोजना म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सरकारी स्स्तरावर राबविण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते. भिवंडी महापालिकेने ही मोहीम शहरभर राबविली असून आतापर्यंत एक लाख ६४ हजार ४१३ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.

पालिकेचे ३५० कर्मचारी व अधिकारी या सर्वेक्षणात कार्यरत आहेत. भिवंडी पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव सध्या आटोक्यात आला असला, तरी गुरुवारी शहरातील बाधित रुग्णांची संख्या पाच हजार ३१७ वर पोहोचली आहे. मात्र, आतापर्यंत चार हजार ६८९ रुग्ण बरे झाले असून ३१९ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.

सध्या शहरातील ३०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, शहरातील नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नसल्याने शहरातील कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.

Web Title: CoronaVirus Reduction in patient incidence rates; Comfortable picture in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.