CoronaVirus: उल्हासनगरात घरोघरी जेवण देण्यावर निर्बंध, महापालिका आयुक्तांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 05:00 PM2020-04-05T17:00:05+5:302020-04-05T17:00:47+5:30
उल्हासनगरात सरासपणे सामाजिक स्वयंसेवी संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधी व इतर संघटनेमार्फत घरोघरी, इमारतींमधून किंवा सोसायटीमधून चपाती बनवून एकत्र केल्या जातात.
उल्हासनगर : घरोघरी जावून जेवणाचे पॉकेट व चपाती प्रत्यक्ष नागरिकांना दिल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त करून त्याला निर्बंध घातले आहे. असा प्रकार झाल्यास कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिल्याने सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी खासगीत नाराजी व्यक्त केली आहे.
उल्हासनगरात सरासपणे सामाजिक स्वयंसेवी संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधी व इतर संघटनेमार्फत घरोघरी, इमारतींमधून किंवा सोसायटीमधून चपाती बनवून एकत्र केल्या जातात.
एकत्र केलेल्या चपात्या गोरगरीब व गरजू नागरिकांना वाटल्या जातात. तर काही ठिकाणी काही व्यक्तीं व लोकप्रतिनिधी जेवणाचे पॅकेट बनवून त्याचे वाटप गरजू, गरीब व झोपडपट्टीतील नागरिकांना केले जाते. मात्र हा प्रकार अत्यंत धोकादायक असून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव एखाद्या ठिकाणी असल्यास त्याचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. कोरोना रोग प्रसारणाची पद्धत आणि त्यावर आवर घालण्याची रीत सर्वच प्रसारमाध्यमांवर रोज आपण पहात आहोत. पोटतिडकीने शासन व महापालिका आपणास वारंवार याबाबत माहिती देत आहे. मात्र हे सर्व समजून घेण्यासाठी आपण का कमी पडतो हेच लक्षात येत नसल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांचे म्हणणे आहे.
शहरातील नागरिकांना असे जेवण देताना अनेक नागरिकांचा हात लावलेली असतो. त्यातील एक जरी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेलतर, या आजाराच्या प्रसारास मदत करणारी ठरू शकते. आपली मदत आपल्या स्वतःच्या जीवाला, कुटुंबाला अथवा इतरांना अपायकारक ठरणार नाही. ही खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे घरोघरी रोटी, चपाती किंवा वाटपासाठी जेवण जमा करणे यावर तात्काळ निर्बंध लादण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. अशा प्रकारची कृती कोणीही करू नये. काही संस्था व संघटना घरोघरी जंतुनाशके फवारण्याची कामे करण्याचाही बाबी समोर आल्या आहेत त्यांच्यावर निर्बंध घालण्यात येत असून कुणीही या निर्देशांचे उल्लंघन केल्यास आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.