Coronavirus: रिक्षाचालक बनला देवदूत; रुग्णांना अहोरात्र मुंबईपर्यंत विनामूल्य सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 04:32 PM2020-04-08T16:32:09+5:302020-04-08T16:32:54+5:30
आतापर्यंत त्यांनी १००हून अधिक रुग्णांना अत्यावश्यक सेवेपर्यंत विनामूल्य रिक्षा सेवा सुरू केली. त्यामुळे एका अर्थाने रिक्षाचालक देवदूत बनून आल्याची भावना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
अनिकेत घमंडी,
डोंबिवली: कोरोनामुळे राज्यात पंधरा दिवसांपासून लॉकडाऊन झालेले असतानाच अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणतीही सेवा सुरू नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेषत: डायलिसीस, कॅन्सर, तसेच ज्यांना सतत रक्त चढवावे लागते, अशा रुग्णांचे सर्वाधिक हाल होत असून त्यांची जास्त गैरसोय झाली आहे. ज्यांना नित्याने उपचारासाठी मुंबईत जावे लागते अशांना वाहनसेवाच नसल्याने आपुले मरण पाहिले म्या डोळा अशी त्यांची स्थिती झाली आहे. रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन म्हात्रेनगर परिसरातील रहिवासी असलेले रुपेश रेपाळ या ज्येष्ठ रिक्षा चालकाने विनामूल्य सेवा देण्याचा संकल्प सोडला. आणि आतापर्यंत त्यांनी १००हून अधिक रुग्णांना अत्यावश्यक सेवेपर्यंत विनामूल्य रिक्षा सेवा सुरू केली. त्यामुळे एका अर्थाने रिक्षाचालक देवदूत बनून आल्याची भावना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
देशभरात संकट आलेले असतानाच आपल्याकडून मातृभूमीची सेवा कशी होईल या प्रश्नाने रेपाळ अस्वस्थ झाले होते. पण रस्त्यावर वाहनेच येऊ द्यायची नसल्याने मनात असूनही रिक्षा चालवता येत नसल्याने त्यांची अडचण झाली होती. मग एकदा आरटीओ अधिका-यांना भेटून तरी येऊ, असे मनाशी त्यांनी ठरवले आणि ते कल्याणला गेले. आरटीओ अधिका-यांनीही रेपाळ यांचा हेतू चांगला असून त्यांना ‘आपात्कालीन सुविधा’ असे विशेष परमिट देऊ केले. आणि त्यामुळे रेपाळ यांचा सेवा करण्याचा संकल्प सिद्धीस आला. आता विनामूल्य सेवा देतांना कोणाकडून काही मागायचे नसले तरीही रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रिक्षेत सीएनजी भरावेच लागणार होते.
आधीच व्यवसाय नसल्याने घरात पैसा नाही, कुटुंबीय देखील त्यामुळे हैराण आहेत. पण तरीही ते संकल्पावर ते ठाम होते. त्यांची सेवा देण्याची तळमळ बघून नगरसेवक मुकुंद पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते अमित कासार यांनी त्यांना इंधनासाठी निधी देण्याचे ठरवले. त्यामुळे रेपाळ यांचा संकल्पसिद्धीस गेला. लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून त्यांनी १०० हून अधिक जणांना रुग्णसेवा दिली आहे. म्हात्रेनगरमध्ये पेडणेकरांच्या कार्यालयासमोर त्यांचा थांबा असतो. अहोरात्र सेवा त्यांची सुरू आहे. रुग्णांची वेळ घेऊन ते त्या वेळेत उपलब्ध होतात.
आणखी जेवढे दिवस लॉकडाऊन असेल तेवढे सगळे दिवस विनामूल्य सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. वाटेत जर कोणी पोलीस, नर्स, वाटसरु जरी अडकला असेल तर त्यांनाही ते सुविधा देतात. आतापर्यंत त्यांनी जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई, मुलुंड, घाटकोपर, कल्याण, डोंबिवली शहरभर सर्वत्र अशी सेवा दिली आहे. जास्ती करुन डायलीसीसचे रुग्ण असल्याचे ते सांगतात. त्यांची गैरसोय आणि पिडा बघवत नाही, मन विषीण्ण होत असल्याचे ते सांगतात. ईश्वराने सेवा करून घ्यावी आणि कोरोनामधून सगळ्यांची मुक्ती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे ते सांगतात.