Coronavirus: केस कापण्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला बसली ‘कात्री’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:20 AM2020-06-29T03:20:58+5:302020-06-29T03:21:09+5:30
सुरक्षिततेच्या साहित्यामुळे वाढला खर्च, झोपडपट्टी भागातील दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन, एकावेळेस एक किंवा दोन ग्राहकांनाच परवानगी
ठाणे : चीनमधून सुरु झालेले कोरोना संपूर्ण जगात पसरला. देशात शिरकाव झाल्यानंतर मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर जूनमध्ये अनलॉक १ ची घोषणा झाल्यानंतर व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत गेले. मात्र यात सलूनचा सहभाग नसल्याने नाभिक समाजाने नाराजी व्यक्त केली होती. लॉकडाऊनमुळे आधीच आमचे नुकसान झाले, उपासमारीची वेळ आली आहे अशा व्यथा व्यावसायिकांनी मांडल्या. त्यानंतर सरकारने काही अटींवर सलूनची दुकाने उघडण्यास रविवारपासून परवानगी दिली.
तीन महिन्यांनतर सलून उघडणार असल्याने आणि त्यात रविवार असल्यामुळे ग्राहकांची गर्दी होईल असे वाटत होते, मात्र ग्राहकांनी कोरोनाच्या भीतीने पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. दरम्यान, केस कापण्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे.
घोडबंदर भागातील मोठ्या सोसायटींच्या ठिकाणी व्यावसायिकांनी पीपीई कीट घातले होते. येणाऱ्या ग्राहकांना तात्परुत्या स्वरुपातील पेपराचे अॅप्रन दिले होते. तसेच प्रत्येक ग्राहकाच्या वेळेस खुर्ची सॅनिटाईज केली जात होती. दुुसरीकडे मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर, सुभाषनगर, घोडबंदरचा आणखी काही झोपडपट्टी भागात मात्र नियम पाळले गेले नसल्याचे दिसले. सॅनिटायझरचा वापर केला जात होता. परंतु पीपीई कीट किंवा इतर सुरक्षेचे उपाय न करता केस कापले जात होते. झोपडपट्टी भागासह मोठ्या सोसायटींच्या ठिकाणी एकावेळेस एक ते दोन ग्राहकांना प्रवेश दिला जात होता. काही ठिकाणी व्यावासायिकांनी हॅन्डग्लोज घातले नसल्याचे निदर्शनास आले. कळवा, मुंब्रा येथील हॉटस्पॉटमध्ये मात्र भीतीपोटी दुकाने उघडली नाही. तर काही भागांमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही आमचे काम करीत आहोत. पीपीई किट घातलेली आहेत. तसेच प्रत्येक ग्राहकालाही प्रवेश देताना विशेष काळजी घेतली जात आहे. - नंदकिशोर ठाकूर, व्यावसायिक
आम्ही आमच्या परीने काळजी घेत आहोत. परंतु ग्राहकांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे. पीपीई किट नसले तरी आम्ही पेपरचे अॅप्रन वापरत आहोत. ग्राहकांची पूर्ण काळजी घेत आहोत. - टी. नागेश, व्यावसायिक
तीन महिन्यांनंतर सलूनमध्ये आलो. येथे सरकारने सांगितलेल्या नियमांप्रमाणे काळजी घेतली जात आहे. आम्हीही आमच्यापरीने काळजी घेत आहोत. - अशोकसोनावले, ग्राहक
कोरोनाच्या वाढत्या महागाईची झळ आधीच डोक्याला ताप देणारी होती. त्यात आता सलूनमध्ये गेलो तर त्या ठिकाणी वाढलेल्या दरांमुळे घाम फुटला आहे. परंतु आता त्यालाही नाइलाज आहे. केस कापणे तर गरजेचे आहे. त्यामुळे आधी १५० देत होतो आता २०० रुपये मोजावे लागले. - प्रवेश सिंग, ग्राहक
५० रूपयांनी झाली वाढ
आधीच कोरोनामुळे अनेकांच्या नोकºया गेल्या आहेत. काहींचे पगार कमी झाले आहेत. असे असतानाच आता तीन महिन्यांनंतर सुरु झालेल्या सलून व्यावसायिकांनीही दर वाढवले आहेत. जिथे १०० रुपये मोजावे लागत होते, तिथे आता १५० रुपये मोजावे लागत आहेत. जिथे १५० रुपये मोजावे लागत होते, तिथे आता २०० रुपये मोजावे लागत आहेत.