Coronavirus: मेडिकल सर्टिफिकेटच्या नावाखाली मजुरांची लूट; २०० ते ३०० रुपयांची होतेय आकारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:24 AM2020-05-07T06:24:03+5:302020-05-07T06:24:13+5:30
खेमचंदानी यांनी परप्रांतीय मजुरांना बोलते केले असता प्रत्येकी २०० ते ३०० रुपये सर्टिफिकेटसाठी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
उल्हासनगर : परप्रांतीय मजुरांची मेडिकल सर्टिफिकेट देण्याच्या नावाखाली २०० ते ३०० रुपयांनी लूट सुरू असल्याचा प्रकार एका समाजसेविकेने उघड केला. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मालवलकर यांनी याबाबत चौकशीचे संकेत देत, पालिका प्रभाग समितीकडून मोफत मेडिकल सर्टिफिकेट दिले जात असल्याची माहितीही दिली.
उल्हासनगर औद्योगिक शहर असून मार्केट, लहान मोठे कारखाने व बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. त्यातील बहुतांश मजुरांना आपापल्या गावी जायचे असून त्यासाठी त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज आहे. महापालिकेने त्यांच्यासाठी प्रभागनिहाय डॉक्टर ठेऊन मेडिकल सर्टिफिकेट देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र सर्टिफिकेटसाठी रांगा लागत असून, खाजगी डॉक्टरच्या सर्टिफिकेटलाही मान्यता असल्याची माहिती पालिकेने आहे.
खाजगी डॉक्टर सर्टिफिकेटसाठी २०० ते ३०० रुपये घेऊन परप्रांतीय मजुरांची लूट करीत असल्याचा आरोप समाजसेविका सरिता खेमचंदानी यांनी केला.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
खेमचंदानी यांनी परप्रांतीय मजुरांना बोलते केले असता प्रत्येकी २०० ते ३०० रुपये सर्टिफिकेटसाठी देत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात टेबल टाकून बसलेल्या एका डॉक्टरने सर्टिफिकेटसाठी २०० रुपये परप्रांतीय मजुरांकडून घेत असल्याची कबुली दिली. तसा व्हिडीओ खेमचंदानी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी या प्रकाराबाबत कानांवर हात ठेवले. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मालवलकर यांनी याबाबत चौकशीचे संकेत दिले आहेत.