CoronaVirus: ठाणे जिल्ह्यातील ५वी ते ८वीपर्यंतच्या शाळा १५ मार्चपासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 07:55 PM2021-03-10T19:55:18+5:302021-03-10T19:55:26+5:30
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुणीही टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६०मधील कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. (CoronaVirus)
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात मागील महिन्याभरापासून पुन्हा कोरोनाबाधित (CoronaVirus) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधील ५वी ते ८वीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. (CoronaVirus: Schools from 5th to 8th in Thane district closed from March 15)
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुणीही टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६०मधील कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली होती. या टाळेबंदीमुळे जिल्ह्यातील सहा महापालिकांसह ग्रामीण भागातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यात कालांतराने कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने टप्याटप्याने टाळेबंदी शिथिल करत २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५वी ते १२वी पर्यंच्या सर्व शाळा महाविद्यालये, आश्रम शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, मागील महिन्याभरापासून पुन्हा कोरोणाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५वी ते ८वीच्या वर्गांसाठी, सर्व प्रकारच्या शाळा, आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे व सर्व आश्रमशाळा, तसेच समाजकल्याण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व शाळा १५ मार्च पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणेत याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत.
याच बरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू ठेवण्यात यावे, असेही नार्वेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे.