coronavirus: शास्त्रीनगर रुग्णालय हाेणार ९ नोव्हेंबरपासून ‘नॉनकोविड’, आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 01:08 AM2020-10-31T01:08:47+5:302020-10-31T01:09:45+5:30
KDMC News : शास्त्रीनगर रुग्णालय कोविडसाठी राखीव असल्याने तेथे अन्य आजारांच्या रुग्णांना उपचार घेता येत नव्हते. त्यामुळे त्यांना सहा किलोमीटरचे अंतर कापून कल्याणला रक्मिणीबाई रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर मनपाकडे अपुरी आरोग्य सुविधा होती. त्यामुळे प्रशासनाने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय डेडिकेडेट कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले. त्यामुळे अन्य आजार तसेच ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांवर तेथे उपचार होत नव्हते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शास्त्रीनगर रुग्णालय ९ नोव्हेंबरपासून नॉनकोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित होईल, असा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढला आहे.
कोरोनाच्या सुरुवातीला मनपाची आरोग्य यंत्रणा तोकडी होती. एप्रिलमध्ये मनपाने शास्त्रीनगर रुग्णालय हे कोविड रुग्णालय असल्याचे घोषित केले होते. तेथे ५२ बेड हे कोरोना रुग्णांसाठी आहेत. त्यामुळे तेथे अन्य आजारांवर उपचार व ओपीडी होती नव्हती. त्यामुळे डोंबिवलीतील अन्य आजारांच्या रुग्णांना कल्याणला रुक्मिणीबाई रुग्णालयात आरोग्य सेवेसाठी जावे लागत होते. कोरोनाची लागण अन्य आजारांच्या रुग्णांना होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली होती. त्यानंतर प्रशासनाने तीन खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अधिग्रहित केली होती. त्यापाठोपाठ २५ खाजगी रुग्णालयांना कोविडवरील उपचाराची परवानगी दिली. दरम्यान, सध्या ३३ रुग्णालयांमध्ये कोविडचे उपचार होत आहेत.
शास्त्रीनगर रुग्णालय कोविडसाठी राखीव असल्याने तेथे अन्य आजारांच्या रुग्णांना उपचार घेता येत नव्हते. त्यामुळे त्यांना सहा किलोमीटरचे अंतर कापून कल्याणला रक्मिणीबाई रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती.
मात्र, अनेकदा रुग्णांना वाहतूककोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे ‘शास्त्रीनगर’ला पुन्हा नॉनकोविड रुग्णालय घोषित करून तेथे पूर्वीप्रमाणेच सर्व आजारांवरील उपचार व ओपीडी सुरू करावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीत १६ सप्टेंबरला झालेल्या कोरोना परिषदेत केली होती.