coronavirus: जनता शोकमग्न, नेते चिखलफेकीत मग्न, कोरोनावरून ठाण्यात शिवसेना राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:32 AM2020-07-09T01:32:13+5:302020-07-09T01:32:47+5:30
जनता अक्षरश: शोकमग्न आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील व राज्यातील सत्ताधारी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भाजप हे पक्ष परस्परांवर आरोपप्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात मग्न आहेत.
ठाणे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याने दोन कुटुंबांवर न भुतो न भविष्यती असा दु:खाचा प्रसंग ओढवला. ठाणे शहरच नव्हे तर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त व त्यांचे कुटुंबीय अपुरी आरोग्यव्यवस्था, औषधांचा काळाबाजार, खासगी रुग्णालयांची लूट यामुळे बेजार आहेत. इतक्या संकटांचा मुकाबला केल्यावरही आपली जीवाभावाची व्यक्ती सुखरूप घरी परतेल, याची खात्री नाही. परिणामी, जनता अक्षरश: शोकमग्न आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील व राज्यातील सत्ताधारी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भाजप हे पक्ष परस्परांवर आरोपप्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात मग्न आहेत.
पालकमंत्री शांत बसल्याने कोरोनाग्रस्तांचे हाल - आनंद परांजपे
ठाणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचे प्रचंड हाल होत आहेत. मृतदेह बदलण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला ठामपा प्रशासनच जबाबदार आहे. पालकमंत्रीही थेट रस्त्यावर न उतरता प्रशासनावर विश्वास ठेवून शांत बसले आहेत. त्याचा त्रास नाहक ठाणेकरांना होत आहे, असा आरोप बुधवारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यास होणारी टाळाटाळ, मृतदेहांची अदलाबदल, ग्लोबल हब कोविड सेंटरमधील अनागोंदी या सर्व प्रकारांवर त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या शहरात प्रशासनाची एकाधिकारशाही सुरू आहे. कोविड सेंटरमधील डॉक्टरांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. गोरगरिबांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. ठामपाने रुग्णालयातील बिलांसाठी आॅडिटर नेमण्याची घोषणा केली असली, तरी डिपॉझिट घेतल्याशिवाय रुग्णांना घेतले जात नाही. लाखोंची बिले दिली जात आहेत. महापालिकेने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. परिणामी, महापालिकेचे पत्र नसल्याचे कारण सांगून अनेक रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेत नाहीत, असे ते म्हणाले.
‘अधिकारी पालकमंत्र्यांना गंडवत आहेत’
पालकमंत्र्यांनाही हे प्रशासन चुकीची माहिती देत आहे. एकंदर, पालकमंत्र्यांना गंडवण्याचा प्रयत्न अधिकाºयांकडून सुरू असून त्यामुळे सरकारला नाहक बदनामी सहन करावी लागत आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम केले, तरच या शहरातील ही महामारी व अधिकाºयांची मुजोरी संपुष्टात येईल, असेही परांजपे म्हणाले.
‘परांजपे घरात दडी मारून बसलेत’
ठाणे : पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे म्हणणारे स्वत: कोरोना झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घरात दडी मारून बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर प्रसंगी पीपीई किट घालून कोविड रुग्णालयांमध्ये जाऊन चौकशी करत असल्याचे त्यांना माहीत नाही. जे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणवणाºया व्यक्तीच्या गावीही नसावे, हे दुर्दैवी असल्याची टीका म्हस्के यांनी बुधवारी आनंद परांजपे यांच्यावर केली. परांजपे यांनी प्रशासन पालकमंत्र्यांची फसवणूक करत असून त्यांनीच रस्त्यावर उतरावे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला.
सेनेने राष्ट्रवादीचा ‘घरचा आहेर’ स्वीकारावा : भाजपची टीका
ठाणे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बेड मिळत नाही, औषधांचा काळाबाजार, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार म्हणजे राज्य सरकार व महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मिळालेला 'घरचा आहेर' आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार व सत्ताधारी शिवसेना व प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचा भाजपचा आरोप १०० टक्के खरा होत आहे, असे मत भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले. गैरव्यवस्था, खाजगी हॉस्पिटलांची लूटमार याकडे भाजपने लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ठाणे शहर धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेली वस्तुस्थिती तरी समजून शिवसेना व प्रशासनाने कामाला लागावे. अन्यथा, जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.