coronavirus: मालिकांच्या चित्रीकरणाला अखेर परवानगी, ‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:39 AM2020-07-06T00:39:27+5:302020-07-06T00:41:04+5:30
मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मालिका, सिनेमांचे चित्रीकरण बंद झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिका, सिनेमे तसेच, चालू असलेल्या मालिकांचे जुने भाग दाखविण्यास सुरुवात केली होती.
ठाणे : ठाण्यात पुन्हा केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात सुरू झालेल्या मालिकांचे चित्रीकरण बंद करावे लागल्याने निर्माते/ दिग्दर्शक/ कलाकारांची खंत २ जुलैच्या अंकात लोकमतने ‘आठ मालिकांच्या चित्रीकरणावर संक्रांत‘ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने सेटच्या बाहेर कोणीही न पडण्याची अटीवर चित्रीकरणाला परवानगी दिली. ती मान्य करून ४ जुलैपासून चित्रीकरणास सुरुवात केली आहे. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांच्यात गोंधळाचे वातावरण असल्याने चित्रीकरण थांबविले होते.
१३ जुलैपासून मालिका पुन्हा भेटीला
मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मालिका, सिनेमांचे चित्रीकरण बंद झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिका, सिनेमे तसेच, चालू असलेल्या मालिकांचे जुने भाग दाखविण्यास सुरुवात केली होती.
परंतु, प्रेक्षकांची मागणी लक्षात घेऊन आठ दिवसांपासून चित्रीकरण पुन्हा सुरू झाल्यामुळे लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेल्या मालिकांचे नवे भाग १३ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितले.
तर चित्रीकरण बंद करणार - माळवी
अनेक निर्माते, दिगदर्शकांनी संपर्क करून मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगीची मागितली होती. त्यानुसार ती दिली आहे. ज्या मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे त्यांनी सेटबाहेर येजा किंवा प्रवास करू नये. सेटवरच युनिटची राहण्याची व्यवस्था करावी. येजा आढळल्यास ताबडतोब चित्रीकरण थांबवणार, असे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.
लॉकडाऊनचे नियम पाळूनच चित्रीकरण सुरू आहे. टीव्ही मालिकांसारखे दुसरे मनोरंजन प्रेक्षकांसाठी नाही. विनाविलंब चित्रीकरण सुरू राहीले तर या मालिका ठरविलेल्या वेळेत भेटीला येतील आणि प्रेक्षक घरातच राहतील. ठाण्यात चित्रीकरणाला परवानगी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाचे आभार.
- नितीन वैद्य, निर्माते
महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत करून महापालिका प्रशासनाचे कौतुक आणि आभार मानतो. पुरेशी दक्षता घेऊन अर्थचक्र सुरू राहायला पाहिजे. त्यामुळे हातावर पोट असलेल्याचे आशीर्वाद मिळतील
- विजू माने, दिग्दर्शक
महापालिकेसोबत फोनवर बोलणे झाले आणि त्यांनी चित्रीकरणास परवानगी दिली. जे कलाकार येऊन जाऊन होते त्यांना वगळून चित्रीकरण करत आहोत. त्यांचे भाग लॉकडाऊन नंतर चित्रित केले जातील
- रवी करमरकर, दिगदर्शक
प्रशासनाने सांगितलेल्या अटींचे पालन आम्ही आधीही करत होतो आणि आताही करत आहोत. येऊरमध्ये चित्रीकरण सुरू आहे. तिथे दोन बंगले घेतले असून पूर्ण युनिटची व्यवस्था त्याच ठिकाणी केली आहे.
- हेमंत सोनावणे, कार्यकारी निर्माते