CoronaVirus News: कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी जाणवतोय लाकडांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:27 AM2020-10-10T01:27:43+5:302020-10-10T01:27:49+5:30
कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी दुर्गम भागातील या गावाच्या जवळपास लाकडे उपलब्ध नसल्याने वाडा तालुक्यातून लाकडे मागवावी लागत आहेत.
- राहुल वाडेकर
विक्रमगड : तालुक्यातील रिवेरा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे समर्पित कोरोना रुग्णालय असून या ठिकाणी ७२ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी दुर्गम भागातील या गावाच्या जवळपास लाकडे उपलब्ध नसल्याने वाडा तालुक्यातून लाकडे मागवावी लागत आहेत.
विक्रमगडपासून सुमारे पाच ते सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हाताणे गावात रिवेरा रुग्णालय आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये साडेतीन लाख रुपये खर्चून गावातील निर्जन ठिकाणी तातडीने स्मशानभूमी बांधण्यात आली.
कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर रुग्णालयाच्या जवळच अंत्यसस्कार करण्याचे व त्याकरिता लाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेने देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे प्रत्येक मृतासाठी पाचशे-साडेपाचशे किलो लाकडाचा खर्च या ग्रामपंचायतीला सोसावा लागत आहे. यासाठी विक्रमगड येथून किंवा वन विभागाकडून लाकडे मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सुमारे २५ किलोमीटर दूरवर असणाºया वाडा येथून अंत्यविधीसाठी लाकडे आणावी लागत आहेत. ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून सव्वा दोन लाख रुपये म्हणजेच सुमारे २५ टक्क्यांहून अधिक उत्पन्न यासाठी खर्च झाल्याने गावातील लघु नळपाणी योजना व इतर विकासकामांना खीळ बसणार आहे. यामुळे येथील मंडळींनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार तालुका आपत्कालीन निधीमधून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.