coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्याकरिता श्रीकांत शिंदे यांनी खासदार निधीतून दिले ५० लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 02:14 PM2020-03-28T14:14:03+5:302020-03-28T14:14:59+5:30
सर्व लोकप्रतिनीधींनी आणि नागरिकांनी एकजुटीने कोरोना विरोधातील लढ्यात राज्य सरकारसोबत राहून आपापल्या परीने या कार्यात सहभाग घ्यावा
कल्याण - कोरोना विषाणुचा संसर्ग देशात तसेच राज्यातही दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित नागरिक राज्यात अनेक ठिकाणी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यातील अनेक शहरात कोरोना (COVID19) वायरसचा शिरकाव झाला असून राज्यासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना बाधित रूग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आकडा वाढतच चालला आहे. कोरोना विषाणू (COVID19) विरोधात सक्षमपणे लढताना राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब जातीने लक्ष देत या विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता युध्दपातळीवर कार्यरत रहात वेळोवेळी अनेक महत्वपूर्ण उपाय योजना राबवत आहेत, असे कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
परंतु अचानक आलेल्या या कोरोना संकटाशी दोन हात करताना राज्य सरकारवर याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार पडत आहे. कोरोनाची तपासणी करण्याकरिता लागणारे संरक्षणात्मक किट, N-95 सह विविध प्रकारचे मास्क, थरमल इमेजिंग स्कॅनर अथवा कॅमेरा, इन्फ्रा रेड थरमामिटर यांसारखी अनेक वैद्यकिय उपकरणे आणि साधने याबरोबरच कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी राज्यभरात संक्रमित व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या विलगकरणासाठी करण्यात आलेली राहण्याची, जेवण आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीची व्यवस्था यांसह अनेक अनेक बाबीं राज्य सरकार करत असताना याचा सरकारी तिजोरीवर खुप मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. यासाठी हातभार म्हणून खारीचा वाटा उचलत कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हणून लोकप्रतिनीधी या नात्याने कोरोना विरोधातील लढ्याकरिता आपल्या खासदार निधीतून रु.५० लाखांचा निधी मा. ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द केला आहे, असे कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्पष्ट केले.
आपण सर्वांनी एकजुटीने या कोरोना विरोधातील लढ्यात राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आपापल्या परीने सहभाग घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी सर्व पक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक. जिल्हा परिषद सदस्य आणि लोकप्रतिनीधी तसेच नागरिकांना यावेळी केले.