Coronavirus: ठाण्याच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याने केली कोरोनावर मात; बाळाची आईदेखील ‘निगेटिव्ह’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 11:55 PM2020-05-03T23:55:34+5:302020-05-03T23:56:20+5:30
२० दिवसांनी परतला घरी
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या सहा महिन्यांच्या ‘आर्यन’ या चिमुरड्याने चक्क कोरोनाला हरवले आहे. तब्बल २० दिवसांनी ठाणे जिल्हा रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर तो शनिवारी घरी परतला आहे. त्याच्यासोबत शनिवारी एकूण ९ जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.
कोरोनावर मात करून शनिवारी जिल्हा रूग्णालयातून घरी परतलेल्या ९ जणांपैकी ठामपा हद्दीतील ५ आणि केडीएमसी व वसई- विरार येथील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. त्यांच्यामध्ये ठाण्यात राहणाºया सहा महिन्यांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर त्याला जिल्हा रुग्णालयात १३ एप्रिल रोजी दाखल केले होते.
तपासणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. इतक्या लहान मुलावर उपचार करणे डॉक्टरांसाठी एक आव्हान होते. तद्पूर्वी, एक चार वर्षांचा मुलगा कोरोनावर मात करून घरी परतला होता. त्या चार वर्षांच्या बालकाचा अनुभव असल्याने डॉक्टरांनी या सही महिन्याच्या बालकावरही उपचार सुरू झाले. या चिमुरड्याच्या आईची टेस्ट निगेटिव्ह होती. त्यामुळे तिला त्याच्यासोबत ठेवण्यात आले. अखेर त्या चिमुरड्याने कोरोनाला हरवले. दरम्यान त्याची आईची पुन्हा तपासणी केल्यावर ती निगेटिव्ह असल्याची खात्री करून घेतल्यावर त्या दोघांना घरी सोडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत १२१ जणांना डिस्चार्ज
गेल्या एक महिन्यापासून कोविड १९ च्या रुग्णांवर ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहेत. तेव्हापासून आतापर्यंत ठाणे जिल्ह्यासह पालघर येथील एकूण २३७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचारार्थ दाखल झाले होते. त्यामध्ये १२१ जणांनी कोरोनाला हरवून ठणठणीत बरे होऊन ते घरी गेले आहेत. सद्य:स्थितीत रुग्णालयात ९५ पॉझिटिव्ह रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. तर याचदरम्यान सहा जणांची प्राणज्योत मालवली आहे.