coronavirus : ...म्हणून मुंब्र्यातील नागरिकांवर जितेंद्र आव्हाड भडकले, सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 01:13 PM2020-04-04T13:13:56+5:302020-04-04T13:15:04+5:30
प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही मुंब्र्यात गर्दी करण्याचे प्रकार कमी होत नसल्याने प्रशासना समोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
ठाणे : शुक्रवारी मुंब्र्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि मुंब्रा-कळवा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड कमालीचे संतप्त झाले आहेत. मुंब्र्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याने ही धोक्याची घंटा असून 'अभी उपरवाला भी आपको बचा नाही सकेगा' असे खडेबोलच जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्याच्या नागरिकांना सुनावले आहे. गेले अनेक दिवस मी घराच्या बाहेर पडू नका असे वारंवार सांगत आहे, मात्र याचे कोणालाच गांभीर्य नसून अशाच प्रकारे जर मस्ती सुरु राहिली तर या शहराला कोणीही वाचवू शकणार नाही असे त्यांनी खडसावून सांगितले आहे.
ठाणे आणि कळवा परिसरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी,मुंब्र्यात परवापर्यंत एकही कोरोना रुग्ण अढळला नव्हता. मात्र शुक्रवारी मुंब्य्रातील अमृतनगर परिसरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या कोरोनाचे काही दिल्ली कनेक्शन आहे का ? या दृष्टीने देखील तपास सुरु करण्यात आला आहे . मात्र प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही मुंब्र्यात गर्दी करण्याचे प्रकार कमी होत नसल्याने प्रशासना समोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्र्याच्या नागरिकांची एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये चांगलीच कानउघडणी केली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून मी तुम्हाला सांगत होतो कि घराच्या बाहेर पडू नका,मात्र कोणीही ऐकले नाही. मी या गोष्टी बोलणार नव्हतो मात्र आज या गोष्टी बोलायची वेळ आली असे सांगत तुम्हालाच तुमच्या जीवाचे परवा नसेल तर इतर कोणाला काय पडली आहे असे त्यांनी सांगितले. या शहराची मला चिंता आहे , कळवा आणि मुंब्र्यातील नागरिकांची मला काळजी आहे मात्र तुम्हालाच तुमची काळजी नसेल तर उपरवाला भी तुम्हे माफ नाही करेगा या शब्दात आव्हाड यांनी मुंब्र्याच्या जनतेला सुनावले असून आता मुंब्र्याची जनता हे किती गांभीर्याने घेणार आहे हे येणार यावर साशंकता आहे .