Coronavirus : भाईंदरमधील रविवार बाजार कोरोनाच्या सावटातही गजबजला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:17 AM2020-03-17T00:17:21+5:302020-03-17T00:17:34+5:30

वाहतुकीला अडथळा ठरणारा हा बाजार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही बंद न ठेवल्याने महापालिका आणि नगरसेवकांचा वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे.

Coronavirus : Sunday market in Bhayandar also Open in the shadow of Corona | Coronavirus : भाईंदरमधील रविवार बाजार कोरोनाच्या सावटातही गजबजला

Coronavirus : भाईंदरमधील रविवार बाजार कोरोनाच्या सावटातही गजबजला

Next

मीरा रोड - कोरोनाचा संसर्ग फैलावू नये, म्हणून एकीकडे गर्दीची ठिकाणे बंद केली जात असताना भाईंदर पश्चिमेतील रविवारचा आठवडा बाजार गजबजला होता. सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिलेले आदेश डावलून भरलेल्या बाजाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारा हा बाजार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही बंद न ठेवल्याने महापालिका आणि नगरसेवकांचा वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे.

नव्याने आलेले प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी महिनाभरापासून कारवाईच गुंडाळून टाकली आहे. पोलीसही दुर्लक्ष करत असल्यामुळे या बाजारावर कोरोनाचाही परिणाम झालेला नाही. गावाचे शहर झाले तरी बाजारवसुली करणाऱ्या ठेकेदारांना आणि त्यात हितसंबंध गुंतलेल्यांनेच हा बाजार रविवारी भरला.

भाईंदर रेल्वेस्थानकापासून भाईंदर शहरच नव्हे तर मुर्धापासून थेट उत्तन-चौक व गोराईपर्यंत जाणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. हा वाहतुकीसाठीचा एकमेव मार्ग असताना रविवार बाजारच्या आड फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांची संख्या आठवड्यागणिक वाढली
आहे.
आधीच बेकायदा पार्किंग, दुकान आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे येथे वाहतूककोंडी नित्याची झालेली आहे. त्यातच रविवार बाजारामुळे भाईंदर पोलीस ठाण्यापासून शिवसेना गल्ली नाकयापर्यंतचा मुख्य रस्ता, दुसरीकडे नगरभवनपर्यंत आणि महापालिका मुख्यालयामागची गल्ली बेकायदा फेरीवाल्यांमुळे व्यापली आहे.
पालिकेचे बसस्थानकही यांनी बळकावले आहे. शहराचा मुख्य मार्ग असल्याने एसटी, एमबीएमटी, बेस्ट या सार्वजनिक उपक्रमांच्या बस, रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते.

अतिक्रमणामुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन लोक अडकून पडतात. आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहनही येथून नेणे अशक्य बनले आहे. त्यातच भुरटे चोर, पाकीटमारांसह महिला-मुलींची छेड काढण्याचे प्रकार नेहमीचेच झालेले आहेत. रविवारचा बाजार सायंकाळपर्यंत बस्तान मांडून बसत आहे.

बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर तसेच फेरीवाल्यांनी टाकलेला कचरा याचा उपद्रव लोकांना सहन करावा लागत आहे. डिसेंबर २०१५ च्या महासभेमध्ये भाजी आणि सुकी मासळीविक्रेत्या स्थानिकांना वगळून अन्य बाजार सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ हलवण्याचा ठराव केला होता.

तोही बासनात गुंडाळला आहे. फेरीवाल्यांशी तसेच बाजारवसुली ठेकेदाराचे नगरसेवक, राजकारणी आणि महापालिकेशी अर्थपूर्ण लागेबांधे असल्याशिवाय पालिका संरक्षण देणे शक्य नसल्याचे आरोप नागरिक करत आहेत.

रविवार बाजारासंबंधी आयुक्तांशी चर्चा केली आहे. या बाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने रविवार बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी तसे आदेश उपायुक्तांना दिले आहेत.
- डॉ. शशिकांत भोसले, पोलीस उपअधीक्षक, भाईंदर

कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणि रहदारी-वाहतुकीला होणारा अडथळा विचारात घेता पालिका रविवार बाजारावर कारवाई करण्यात येणार आहे.
-चंद्रकांत डांगे, आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

Web Title: Coronavirus : Sunday market in Bhayandar also Open in the shadow of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.