Coronavirus: संशयित, इतर रुग्णांवर एकत्र उपचार; मध्यवर्ती रुग्णालयातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 12:49 AM2020-06-30T00:49:17+5:302020-06-30T00:49:34+5:30
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय काही दिवसांपासून चर्चेत आले असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह २१ पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, ग्रामीण परिसर, अंबरनाथ व बदलापूर आदी ठिकाणांहून दररोज शेकडो रुग्ण मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी येतात. कोरोना संशयित आणि इतर रुग्णांवर जनरल वॉर्डातच उपचार होत असल्यामुळे हे रुग्णालय हॉटस्पॉट ठरत असल्याची टीका होत आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय काही दिवसांपासून चर्चेत आले असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह २१ पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, ग्रामीण भागातून विविध आजारांनी ग्रस्त असलेले शेकडो रुग्ण दररोज उपचारांसाठी येतात. यामध्ये कोरोनाचे लक्षण असलेल्या रुग्णांचा समावेशही असतो. मात्र, या रुग्णांचा वैद्यकीय अहवाल येईपर्यंत त्यांच्यावर इतर रुग्णांसोबतच उपचार करावे लागत आहेत. आतापर्यंत अशा अनेक रुग्णांचा अहवाल पोझिटिव्ह आल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जाफर तडवी यांनी दिली. या प्रकारामुळे संसर्ग वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. हे टाळण्यासाठी आणि सर्वच रुग्णांना उपचार मिळण्यासाठी वेगळे रुग्णालय आणि विशेष वॉर्डाची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शहरातील हृदयरोग, दमा, सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शन आदी रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन डॉक्टरांसह शासकीय व खाजगी रुग्णालयाचा बदलला आहे.
कोरोनाच्या भीतीने व स्वाब अहवाल येईपर्यंत त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे इतर रोगांवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी केला. राज्य शासन व महापालिका प्रशासन यातून धडा घेणार की नाही? असा सवाल त्यांनी केला. कोरोना संशयित रुग्णांवर स्वाब येण्याची वाट न पाहता कोणत्याही रुग्णालयात तातडीने उपचार व्हावेत. तसेच सर्वच रुग्णांना उपचार मिळण्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा राज्य शासनासह महापालिका प्रशासनाला दिला आहे.
शहर लॉकडाऊन करण्याची मागणी
शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात काही दिवस कडक लॉकडाऊन करण्याची मागणी मनसेसह ओमी टीम व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे.