coronavirus: मजूर गावाला गेल्याने धान्य गोदामातच, रेशनिंग दुकानांवर तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:15 AM2020-05-14T02:15:56+5:302020-05-14T02:16:27+5:30
- अनिकेत घमंडी डोंबिवली : मे महिन्यातील तांदूळ आणि गहू घेण्यासाठी पूर्वेतील १०८ आणि पश्चिमेतील ५६ शिधावाटप दुकानांवर केशरी ...
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : मे महिन्यातील तांदूळ आणि गहू घेण्यासाठी पूर्वेतील १०८ आणि पश्चिमेतील ५६ शिधावाटप दुकानांवर केशरी कार्डधारक गर्दी करत आहेत. मात्र, धान्य मिळत नसल्याने काही ठिकाणी लाभार्थी आणि दुकानदारांमध्ये वादावादी होत आहे. ठिकठिकाणच्या गोदामांमध्ये धान्यसाठा मुबलक आला असला तरी तो शिधावाटप दुकानांपर्यंत पोहोचवण्यासाठी मजूरच नसल्याने सगळा घोळ निर्माण झाला आहे.
पूर्वेत ४१ हजार ३०० आरसी तर, ३६ हजार ६०० केशरी कार्डधारक आहेत. त्या तुलनेत पश्चिमेत कमी लाभार्थी आहेत. पूर्वेकडील शिधावाटप अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉकडाउनच्या काळात लाभार्थ्यांपर्यंत धान्य देण्यासाठी सरकारच्या नियोजनानुसार ७३ ट्रक धान्य एप्रिलमध्ये आले. मे महिन्याचेही धान्य भिवंडी परिसरातील गोदामांमध्ये आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने धान्य वितरणाचा वेग पूर्व आणि पश्चिमेत मंदावला आहे. आतापर्यंत या महिन्याच्या सुरुवातीलाच जे धान्य यायला हवे होते, ते पूर्णपणे आलेले नाही. १३ मेपर्यंत ७३ पैकी २० ट्रक धान्य यायचे बाकी होते. केशरी कार्डधारकांना जे धान्य मिळणार होते त्यासाठीही ४२ ट्रक धान्य येणार होते, परंतु, ३१ ट्रक आतापर्यंत आले आहेत. चार दिवसांमध्ये ते धान्य येईल असे सांगितले जात असले तरी लाभार्थ्यांची समजूत घालताना दुकानचालकांच्या नाकीनऊ येत आहेत. परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल व सगळ्यांना धान्य मिळेल, याबाबतचे आदेशही संबंधितांना दिल्याचे सांगण्यात आले.
उडवाउडवीची उत्तरे
तुकारामनगर भागातील लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मंजूर असलेले धान्यही मिळत नसल्याने त्यांनी दुकानदाराकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी दाद कोणाकडे मागायची, असा सवाल नगरसेवक नितीन पाटील यांनी केला आहे. त्यासंदर्भात शिधावाटप अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे ते म्हणाले. तक्रार नोंदवण्यासाठी तक्रारवही मागितली असता दुकानदार टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी सांगितले.