Coronavirus: ‘परराज्यांतून बसने येणाऱ्यांचीही चाचणी करा’; ठाणे महापौरांचं आयुक्तांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:32 AM2020-10-12T00:32:59+5:302020-10-12T00:33:17+5:30
महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाणे : परराज्यांतून येणाºया श्रमिक व प्रवाशांची ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील सॅटिस थांब्यावर अॅण्टीजेन तपासणी करून त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे. मात्र, ठाणे शहरात अन्य मार्गानेही परराज्यांतील प्रवासी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील पूर्वद्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलाखाली परप्रांतांतून येणाºया अनेक बसेस बेकायदेशीरपणे थांबतात. यातून येणाºया प्रवाशांची कोणतीही आरोग्य तपासणी केली जात नाही. बसथांब्यांच्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा कार्यरत नसल्याने हे प्रवासी शहरात सहज दाखल होत आहेत. या प्रवाशांना अनेक रिक्षावाले कोणतीही खातरजमा न करता इच्छितस्थळी पोहोचवतात. त्यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका संभवतो. या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यात परराज्यांतून बसेस अथवा खाजगी वाहनाने शहरात येणाºया प्रवाशांचेही प्रमाण वाढले आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा दृष्टीने प्रशासन शहरात विविध प्रयत्न करत आहे.
दुसरीकडे हे प्रवासी अशाप्रकारे विनातपासणी शहरात येत असून त्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून याप्रकरणी तातडीने कार्यवाही करावी. तसे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी महापौरांनी केली आहे.