coronavirus: ठाणे शहरात रुग्णदुपटीचा कालावधी 299 दिवसांवर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९२ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 12:15 AM2020-12-08T00:15:52+5:302020-12-08T00:16:21+5:30
Thane News : रुग्णदुपटीचा कालावधी हा २९९ दिवसांवर आला असल्याने ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब आहे. रोजची बाधित रुग्णसंख्यादेखील ३०० वरून १५० च्या आसपास आली आहे.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या कधी वाढताना तर कधी कमी होत आहे. परंतु, रुग्णदुपटीचा कालावधी हा २९९ दिवसांवर आला असल्याने ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब आहे. रोजची बाधित रुग्णसंख्यादेखील ३०० वरून १५० च्या आसपास आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९२ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.२८ टक्क्यांवर आला आहे. तर रोज रुग्णवाढीचे प्रमाण ७.४६ टक्के एवढे आहे. यामुळे तूर्तास तरी दुसरी लाट दिसत नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी चाचण्यांची संख्या पाच हजारांहून अधिक केली. त्यामध्ये सुरुवातीला दररोज ३०० ते ४०० रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्येत घट झाली आहे. आता रोज १५० ते २०० रुग्ण आढळत आहेत.
महापालिका क्षेत्रात आतापर्यंत सहा लाख ९८ हजार ८९८ कोरोनाचाचण्या केल्या असून, त्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात आतापर्यंत ५२ हजार १५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४९ हजार ५०५ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचे प्रमाण ९४.९२ टक्के इतके
आहे.
तसेच शहरात आतापर्यंत एक हजार १९१ रुग्ण मृत पावले आहेत. त्याचे प्रमाण २.२८ टक्के इतके आहे. काही दिवसांपूर्वी हेच प्रमाण २.३८ टक्के एवढे होते. त्याचबरोबर शहरात केवळ एक हजार ४६१ रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नव्हती. परंतु, आता रुग्णसंख्या घटल्याने शहरातील रुग्णालयांमधील खाटा रिकाम्या झाल्या आहेत.
त्याचबराेबर रुग्णच कमी हाेत असल्याने ठाणे महापालिका प्रशासनाला माेठा दिलासा मिळाला आहे.
...तर ४५ जणांना केले जाते क्वारंटाइन
आजही एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्या संपर्कातील ४५ जणांना क्वारंटाइन केले जात आहे. त्यातही सध्या रुग्णांची संख्या घटत आहे. रुग्णदुपटीचा कालावधी हा २९९ दिवसांवर आला आहे. जो काही दिवसांपूर्वी २२९ दिवसांचा होता.