Coronavirus : ठाणे जिल्ह्यात १६१ नागरिक देखरेखीखाली, २२ जणांत कोरोनाची लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:40 AM2020-03-18T06:40:08+5:302020-03-18T06:40:33+5:30
जिल्हा व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांनी परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरामध्येच वेगळे राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने ठोस पावले उचलली आहेत. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्हा व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांनी परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरामध्येच वेगळे राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
आरोग्य पथके सर्वांच्या घरी जाऊन त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आहेत का, याची पाहणी करीत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २२ जणांमध्ये लक्षणे आढळली असून, या सर्वांना रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात दाखल केले आहे.
ठाण्यात कोरोनाचा एक तर नवी मुंबई आणि कल्याणमध्ये प्रत्येकी तीन रु ग्ण आढळले आहेत. परदेशातून प्रवास करून आलेल्या रु ग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अशा प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरात राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्यापैकी २२ जणांचा १४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत २२ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असून, त्यांना उपचारासाठी मुंबईतील रु ग्णालयात दाखल केले आहे. आरोग्य यंत्रणेने गर्दीच्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, शहरात फलकांद्वारे जनजागृती केली जात आहे.
कोणत्या देशातून किती आले?
चीन १६, अमेरिका - ०५, फ्रान्स -०३, दुबई -४२, इराण -२१, सिंगापूर -०४, इटली - ०५, थायलंड - ०३, जपान - ०३, भुतान ०४, मस्कत - ०२, पुणे - ०३, सौदी - ०९, जर्मनी -०५, बहरीन - ०१, कोरीया - ०२, इंडोनेशिया - ०१, युके - ०६, कतार - ०१, मॉरीशस - ०१, गोरखपूर -०४, तुर्की - १, आर्यलन्ड - ०१, युएई - ०३, केरळ - ०१, रोमानीया - ०१, इतर -१३, एकूण - १६१
महापालिका हद्दीत आणखी १९ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी नऊ जणांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे. दहा जणांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील दहा दिवसांत शहरात टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून परदेशातून आलेल्या १११ नागरिकांना त्यांच्याच घरात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ज्या तीन महिला कोरोनाबाधित टॅक्सीचालकाच्या संपर्कात आल्या होत्या, त्यांचे रिपोर्टही निगेटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. ज्यांना सर्दी, खोकला असेल त्यांनीच मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिरुद्ध माळगावकर यांनी केले आहे.
विलगीकरण केंद्रात तीन रुग्ण वाढले
पनवेल : पनवेल महानगरपालिकेने ग्रामविकास भवनात स्थापन केलेल्या विलगीकरण केंद्रात दाखल केलेल्या नागरिकांचा आकडा वाढला आहे. नव्याने परदेशातून आलेल्या तीन नागरिकांना या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रातील नागरिकांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.
रविवारी सायंकाळी ३५ नागरिकांना या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते. यापैकी बहुतांशी नागरिक दुबईवरून परतले आहेत. दुबईमार्गे भारतात दाखल झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाल्याने दुबईसह परदेशातून येणाºया नागरिकांना तत्काळ विलगीकरण केंद्रात ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
सोमवारी या विलगीकरण केंद्रात दाखल केलेल्या नागरिकांना योग्य सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप केला होता. मात्र पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याची गंभीर दखल घेत सर्व सोयी-सुविधा नागरिकांना पुरविण्याचे आदेश सोमवारी पालिका प्रशासनाला दिले. या विलगीकरण केंद्रातील नागरिकांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळली नसली तरी एकूण १४ दिवस सर्वांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. या नागरिकांची नियमित तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, पनवेल परिसरातील आणखी नागरिक परदेशात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विलगीकरण केंद्रातील नागरिकांची संख्या पुढील दिवसात वाढणार आहे.
कामोठेत अफवांना पेव
कामोठे शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यापासून पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अफवांना पेव फुटले आहे. कामोठे येथील ६२ वर्षीय रुग्णाला मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त एकही रुग्ण पनवेल महानगरपालिक ा क्षेत्रात नाही. त्यामुळे शहरवासीयांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.