CoronaVirus in Thane : गरजूंच्या सोयी-सुविधेसाठी जिल्हा सनियंत्रण समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 09:02 AM2020-03-30T09:02:33+5:302020-03-30T09:03:30+5:30
CoronaVirus : करोना प्रतिबंध व लॉकडाऊन कालावधीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व उपाययोजनांचे नियोजन करणे व निर्णयांची अंमलबजावणी करणे आणि सनियंत्रण ठेवणे यासाठी ही समिती काम करेल.
ठाणे : लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना, पाणी, अन्नधान्य तसेच भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा या सुविधा स्वयंसेवी संस्थाच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील महानगराचे क्षेत्र वगळता अन्य भागासाठी जिल्हाधिकारी स्तरावर तर शहरी भागासाठी महानगरपालिका स्तरावर समिती असतील. करोना प्रतिबंध व लॉकडाऊन कालावधीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व उपाययोजनांचे नियोजन करणे व निर्णयांची अंमलबजावणी करणे आणि सनियंत्रण ठेवणे यासाठी ही समिती काम करेल.
जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज पुढीलप्रमाणे राहील- जिल्ह्यातील विविध भागामध्ये विविध घटकातील जीवनावश्यक सुविधा ज्यांना मिळालेली नाही असे मजूर, विस्थापित व बेघर यांची यादी निश्चित करणे, त्याप्रमाणात अन्न्धान्याची आवश्यकता व उपलब्धता याचा तपशील ठरविणे, मदत देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, धर्मादाय संस्था, सहकारी संस्था, तसेच सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देणा-या खाजगी कंपन्या यांची यादी तयार करणे, शिजवलेले अन्न वितरित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे.
गरजूंना तात्पुरती निवारागृहे उपलब्ध करून देणे; शाळा, महाविद्यालये, समाजमंदिर, मंगल कार्यालय व इतर निवास योग्य सभागृहे अशी योग्य ती ठिकाणे निवडून प्राधान्याने जिल्हयाच्या मुख्यालयी व आवश्यकतेनुसार इतर सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर विशेषत: औद्योगिक वसाहतीनजिक तात्पुरत्या राहण्याची सोय करावी. ऊसतोड कामगारांकरिता संबंधित साखर कारखान्यांनी निवारागृहाची व्यवस्था करणे आदीसाठी ही समिती काम करेल.