CoronaVirus in Thane : लॉकडाऊनचा कोळी बांधवांना फटका, मासेमारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 11:47 AM2020-04-02T11:47:52+5:302020-04-02T12:40:55+5:30
CoronaVirus in Thane : मासे विक्रीवर मोठा परिणाम झाल्याने वेगवेगळ्या समुद्रकिनारी हजारो बोटी गेल्या काही दिवसांपासून उभ्या आहेत.
- विशाल हळदे
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भाईंदर शहराला लागून असणा-या उत्तन, चौक, मोर्वे, वसई, गोराई आणि आजूबाजूला लागून असलेल्या गावांतील कोळी बांधवांना कोरोनामुळे चांगलाच फटका बसला आहे. मासे विक्रीवर मोठा परिणाम झाल्याने वेगवेगळ्या समुद्रकिनारी हजारो बोटी गेल्या काही दिवसांपासून उभ्या आहेत.
जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा बंद केला नसल्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात येणाºया अनंत अडचणी मच्छीमारांनी सांगितल्या. लोकमतशी बोलताना रितेश मुंबईकर (व्यवसाय मासे मारी) म्हणाले की, 25 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आली, त्यावेळी आम्ही मासेमारीसाठी समुद्रात होतो. लॉकडाऊनची आम्हाला कल्पनाही नव्हती. आम्ही नेहमीप्रमाणे मासे घेऊन काठावर आल्यानंतर 21 दिवसांच्या लॉकडाऊनची माहिती मिळाली.
आधी कल्पना नसल्याने, इतक्या मेहनतीने पकडून आणलेली मासळी बरेच दीवस बोटीतच ठेवली. परंतु आता बोटीत असलेल्या कोल्ड रूममधील बर्फ संपला आहे. त्यामुळे मासळी खराब होऊ लागली आहे. त्यामुळे मासळी फेकून द्यावी लागत आहे. एका फाफेरीला, म्हणजेच आम्ही कवीला (मासे पकडायला ) समुद्रात जातो तेव्हा आम्हाला डिझेलसाठी जवळजवळ 70 हजार रुपये लागतात. बर्फासाठी 10 हजार रुपये आणि जेवणासाठी 10 ते 15 हजार रुपये जवळजवळ 80 ते 90 हजार रुपये जातात. आता आमचे नुकसान कोण भरुन देईल, आम्ही कोणाला जाब विचारायचा असा सवाल एडविन मांतो ( मच्छीमार ) यानी केला.
एकीकडे सरकार सांगते की जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा आम्ही थांबवलेला नाही. दुसरीकडे आम्ही मासे विकायला निघालो की आम्हाला पोलीस सोडत नाहीत. मासे नेण्यासाठी गाडी मिळत नाही, बर्फ बनवला जात नाही, अशा एक ना दोन अनेक अडचणी मच्छीमारांनी मांडल्या. मासेविक्रीत येणा-या अडचणी पाहता मच्छीमारांनी मासेमारी जवळपास बंद केली असून, त्यामुळे हजारो बोटी किनाºयावर उभ्या आहेत.