CoronaVirus: कोरोना योद्ध्यांना त्रास दिल्यास सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 12:55 AM2020-04-25T00:55:42+5:302020-04-25T07:11:01+5:30

कोरोनाने संपविली ठाणेकरांची माणुसकी; अनेक सोसायट्या देत आहेत त्रास

CoronaVirus thane municipal corporation to cut water supply of buildings if they harasses Corona warriors | CoronaVirus: कोरोना योद्ध्यांना त्रास दिल्यास सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित

CoronaVirus: कोरोना योद्ध्यांना त्रास दिल्यास सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित

Next

- अजित मांडके 

ठाणे : कोरोनाशी सामना करण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये केवळ पोलीस, डॉक्टर हेच येत नसून अनेक जण या सेवेत मोडत आहेत. परंतु, ते कामावरून घरी परतल्यावर त्यांना कुठे इमारतीचा दरवाजा बंद असतो, तर कुठे तुम्ही तुमची सोय बाहेर करा, इथे येऊ नका, असे सांगून त्यांना चक्क घराबाहेरच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. यातूनच आता माणुसकी संपली की काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेने अशा सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. या बिकट परिस्थितीत काहीजण तारेवरची कसरत करून अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सज्ज होत आहेत. अनेकांनी इतरांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या भीतीमुळे ठाण्यात अनेक सोसायट्यांमध्ये स्थानिकांनी माणसुकी गहाण टाकल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज शहरात या रुग्णांची संख्या १८० च्या घरात गेली आहे. त्यामुळे हा प्रकोप रोखण्यासाठी पोलीस, पालिका प्रशासन, काही सामाजिक संघटना, नागरिक पुढे येत आहेत. परंतु, हा वेगाने पसरणारा संसर्ग असल्याने सर्वांनीच धसका घेतला आहे. याच कारणामुळे माणुसकीदेखील काहीशी कमी झाल्याचे चित्र ठाण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाºया नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

हे आहेत कोरोना योद्धे
अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये केवळ पोलीस किंवा डॉक्टरच येत नाहीत. तर महापालिकेतील सफाई कामगार, फवारणी करणारे, इतर कर्मचारी, अधिकारी, पाणीपुरवठा कर्मचारी, महावितरण कर्मचारी, दूरसंचार, आयटी कर्मचारी, बँक कर्मचारी, प्रसारमाध्यमांतील कर्मचारी वर्गाबरोबर काही खाजगी कंपनीतही सॅनिटायझर तयार करण्याचे काम करीत आहेत़ कोणी मास्क बनविण्याचे काम करीत आहे, तर काही जण समाजालाही आपले काही देणे लागते म्हणून या संकटात अडकलेल्यांसाठी मदतीचा हात पुढे करीत आहेत.

असा होत आहे छळ
एकीकडे हे सर्वजण आपल्या जीवाची पर्वा न करता तारेवरची कसरत करून या संकटात अडकलेल्यांसाठी मदतीचा हात पुढे करीत आहेत. परंतु, यातील अनेकांना आता ते ज्या घरात राहत आहेत, त्या सोसायट्यांची दारे बंद केली जात आहेत.

कुठे इमारतीच्या प्रवेशद्वाराला लॉक केले जात आहे, तर कुठे जाणूनबुजून अशांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही जण तर कोरोना बरा होत नाही, तोपर्यंत तुमचे कार्य बाहेर राहूनच करा, असे सुनावत आहे. त्यामुळे संकटांचा सामना करून घरी आलेल्यांना आता घरही परके झाल्याचे दिसत आहे.

एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी एकजूट करून प्रशासन काम करीत आहे़ त्यांच्या मदतीला इतर मंडळींदेखील काम करीत असताना त्यांनाच अशा पद्धतीने वागणूक दिली जात असल्याने माणसातील माणुसकी संपली की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

ठाण्यातील १४६३ सहकारी संस्थांना नोटिसा
पोलीस आयुक्तांनी बजावले : कोरोना योद्ध्यांना कोणताही त्रास देऊ नका
ठाणे : कोरोनाचा सामना करणाºया योद्ध्यांना गृहनिर्माण संस्था व संकुलातील पदाधिकारी व रहिवाशांनी मानसिक व शारीरिक त्रास देऊ नये, यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १४६३ गृहनिर्माण संस्था आणि गृहसंकुलांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्तालयांतर्गत अजूनही काही शिल्लक असलेल्या संस्थांना पोलीस ठाण्यामार्फत पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित व्यक्ती, पोलीस, स्वच्छता विभागातील कर्मचारी हे ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था, संकुलात राहतात, त्या अधिकारी/कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारे मानसिक व शारीरिक त्रास देण्यात येऊ नये, याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांच्या स्तरावर गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाºयांना ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार, आयुक्तालयातील परिमंडळ-१ मध्ये १५२, परिमंडळ-२ मध्ये १५५, परिमंडळ-३ मध्ये ९०६, परिमंडळ-४ मध्ये ८५ आणि परिमंडळ-५ मध्ये १६५ अशा एक हजार ४६३ सहकारी संस्थांना नोटिसा बजावल्या असून या योद्ध्यांना त्रास देऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

आयुक्तालय क्षेत्रात काही ठिकाणी स्थानिक रहिवाशांकडून कोरोनाशी सामना करणाºया योद्ध्यांना गृहनिर्माण संस्थांसह संकुलांतील रहिवाशांकडून वाळीत टाकण्याच्या, मानसिक त्रास देण्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस आयुक्तांनी या नोटिसा बजावल्या आहेत.

Web Title: CoronaVirus thane municipal corporation to cut water supply of buildings if they harasses Corona warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.