CoronaVirus News: महिलेच्या उपचाराचा खर्च ठामपा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 01:28 AM2020-06-15T01:28:46+5:302020-06-15T01:30:01+5:30
चुकीच्या कोरोना रिपोर्टमुळे नाहक मनस्ताप : गोंडस मुलीला दिला जन्म
ठाणे : कोरोना रिपोर्टच्या गोंधळामुळे मनस्ताप सहन करावा लागलेल्या महिलेच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय अखेर ठाणे महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या वतीनेच या महिलेला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून बाळाचे वजन तीन किलो असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने दुसऱ्याच महिलेचा रिपोर्ट नायर हॉस्पिटलला पाठविण्यात आल्याने हा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, ठाणे महापालिकेची यामध्ये कोणतीही चूक नसल्याचा खुलासाही पालिका प्रशासनाने केला आहे.
भिवंडी खारबाव या परिसरात राहणाºया ३४ वर्षीय महिलेच्या कोरोना रिपोर्टच्या गोंधळामुळे ठाणे महापालिका आणि सिव्हिल रुग्णालयातील आरोग्य यंत्रणाच कामाला लागली होती. पत्नीचा रिपोर्ट चुकीचा दिला असल्याचा आरोप करीत या महिलेच्या पतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या चुकीमुळेच पत्नी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचा आरोप केला होता. यावर प्रशासनाने पुन्हा खुलासा केला असून ती महिला पॉझिटिव्हच होती तसेच ज्या दुसºया महिलेचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून नायर रुग्णालयात पाठविण्यात आला होता, ती महिलाही पॉझिटिव्हच होती, असा खुलासाही प्रशासनाने केला आहे. त्यामुळे यामध्ये ठाणे महापालिकेची कोणतीही चूक नसल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे या महिलेला मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर ठाणे महापालिकेनेच या महिलेला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तिने रविवारी एका गोंडस मुलीला जन्मही दिला. तिच्यावरील उपचाराचा सर्व खर्चही पालिका प्रशासनाच्या वतीनेच उचलला जाणार असल्याचेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या महिलेच्या पतीकडून मात्र ठाणे महापालिकेवर आरोप करणे सुरूच आहे. ज्या खासगी रुग्णालयात आपल्या पत्नीला दाखल करण्यात आले आहे, त्यांच्याकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अर्थात, असा कोणताही प्रकार या हॉस्पिटलकडून झाला नसून उलट संबंधित व्यक्तींकडून महिलेवर उपचार करणाºया नर्स आणि डॉक्टरांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरु असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
चूक नसताना मानवतावादी दृष्टिकोनातून ठाणे महापालिकेने सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, महिलेच्या नातेवाइकांनीही आरोग्य यंत्रणांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अशाप्रकारे आरोग्य यंत्रणेवर आरोप करणे योग्य नाही.
- नरेश म्हस्के,
महापौर, ठाणे
नायर हॉस्पिटलला दुसºया महिलेचा रिपोर्ट पाठवल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. ठाणे महापालिकेकडून या महिलेला योग्य रिपोर्टचा संदेश पाठवण्यात आला होता. पालिकेची चूक नसतानाही या महिलेचा सर्व खर्च पालिका उचलणार आहे.
- विश्वनाथ केळकर,
उपायुक्त, ठा.म.पा.