CoronaVirus कोरोनाग्रस्त रुग्णाने मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या; पुणे ते मीरा भाईंदर प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 10:51 PM2020-03-29T22:51:02+5:302020-03-29T22:51:41+5:30
रुग्णाच्या कुटुंबातील ५ सदस्य सुध्दा रुग्णालयात दाखल
मीरारोड - मीरा भार्इंदर मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळुन आला असुन सदर रुग्णा सह त्याच्या कुटुंबातील अन्य ५ सदस्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर रुग्ण ५५ वर्षांचा असुन तीन आठवड्याभरा पूर्वी तो पुण्याला जाऊन आला होता. काल रविवारी कस्तुरबासह शहरातील अन्य रुग्णांनी दाखल करुन न घेतल्याने तो कोकीळाबेन रुग्णालयात दाखल झाला. सदर रुग्णाने मुलीच्या लग्नाच्या पत्रिका अनेकांना वाटल्या असुन त्याच्या संपर्कातील लोकांची शोधाशोध केली जात आहे.
मीरारोड भागात राहणारा सदर ५५ वर्षांचा रुग्ण हा आधी फेमीली कॅयर या सेव्हन सक्वेअर शाळे समोरील रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्टरांना संशय वाटल्याने शुक्रवारी त्याचे नमुने तपासणी साठी नेण्यात आले. एका खाजगी लॅबने शनिवारी सायंकाळी कोरोनाची लागण झाल्याचा चाचणी अहवाल दिल्या नंतर त्याला भार्इंदरच्या भिमसेन जोशी पालिका रुग्णालयासह शहरातील अन्य काही बड्या खाजगी रुग्णालयांनी देखील दाखल करुन घेण्यास नकार दिला. शेवटी रवीवारी पहाटे २ च्या सुमारास कोकीळाबेन रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्याच्यासह त्याच्या मुलास देखील तेथेच दाखल केले आहे.
त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्या नंतर पालिकेने त्याच्या घरातील पत्नी, दोन मुली व दुसराया मुलास आज रवीवारी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णाच्या ५ कुटुंबियांचा अहवाल अजुन आलेला नाही. एकाच कुटुंबातील सहा जणांना रुग्णालयात दाखल केल्याने मीरा भार्इंदर मध्ये मात्र खळबळ उडाली आहे. महापालिकेने रुग्ण रहात असलेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासह लोकांची माहिती व तपासणी घेण्याचे काम सुरु केले आहे.
पालिका सुत्रांनुसार सदर रुग्ण वा त्याचे कुटुंबियात कोणी परदेशातून आलेला नाही. मुलीचे लग्न असल्याने तीन आठवड्याआधी रुग्णाने पुण्याला पत्रिका देण्यासाठी प्रवास केला होता. शिवाय शहरात देखील त्याने अनेकांना पत्रिका वाटल्या. लॉकडाऊन जाहीर झाल्या पासुन मात्र तो घरातच असल्याचे सांगण्यात आले.
सदर रुग्णाच्या कुटुंबियांना कस्तुरबा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पालिकेच्या रुग्णवाहिकेचे चालक तसेच वैद्यकिय कर्मचारी आदींसाठी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणुन आवश्यक किट वगैरे साहित्यच पालिकेकडे नसल्याने कर्मचारी सुध्दा धास्तावले आहेत. कुटुंबियांना घरुन कस्तुरबा रुग्णालयात सोडण्यासाठी गेलेल्या चालक व कर्मचारायांनी चक्क प्रसुतीच्या वेळी वापरले जाणारे अॅपरन आदी घातले होते. पालिकेने वेळीच आवश्यक कीट वगैरे कर्मचारी, डॉक्टरांसाठी दिले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.