CoronaVirus in Thane : जिल्ह्यातील आज दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू, संख्या पोहोचली 1809 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 09:16 PM2020-05-08T21:16:04+5:302020-05-08T22:05:41+5:30
CoronaVirus in Thane :गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी 154 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
ठाणे: जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही नव्या रुग्णांनी शंभरीचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी आढळून आलेल्या 154 रुग्ण संख्येमुळे जिल्ह्याची रुग्ण संख्याही एक हजार 809 इतकी झाली आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील ठाणे महापालिकेने 600 तर नवीमुंबईने 500च्या आकड्याची सीमारेषा पार केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 51 रुग्ण हे ठामपा कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे एकही नवीन रुग्ण मिळून आला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी 154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच ठाणे महापालिका हद्दीत सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. शुक्रवारी सापडलेल्या 51 रुग्णांपैकी15 रुग्ण हे लोकमान्य नगर सावरकरनगर प्रभाग समितीमधील आहेत. त्या पाठोपाठ वागळे इस्टेट -14 आणि दिवा येथील 12 रुग्णांचा समावेश आहे.तसेच त्या नव्या रुग्णांमध्ये 30 महिला रुग्ण असून 21 पुरुष रुग्ण आहेत.
या सापडलेल्या 51 रुग्णांनी ठामपामधील एकूण रुग्ण संख्या 611 इतकी झाली आहे.तर,कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत 27 रुग्ण सापडले असून त्यामधील 20 रुग्ण हे मुंबई,ठाणे आणि वाशी येथे कामाला जाणारे आहेत. त्या 27 जणांमध्ये 17 पुरुष रुग्ण असून 10 महिला रुग्णांचा समावेश आहे.तसेच नवीमुंबईत नवे 43 रुग्ण मिळून आल्याने तेथील रुग्ण संख्याही आता 527 वर पोहोचली आहे. त्यातच नवीमुंबईत दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात दगावणाऱ्यांची संख्या 46 झाली आहे. तर नवीमुंबईतील मृतांची संख्या 10 वर गेली आहे.
भिवंडीत एका नव्या रुग्ण सापडल्याने येथील संख्या ही 21 झाली आहे. बदलापूरात 4 रुग्ण मिळून आल्याने येथील एकूण रुग्ण संख्या 46 झाली आहे. मिराभाईंदरमध्ये 21 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या 223 झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ही 7 नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 72 वर पोहोचली आहे. तसेच अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे एकही नवा रुग्ण मिळून न आल्याने येथील रुग्ण संख्या स्थिर राहिली आहे. ती अनुक्रमे 12 आणि 17 इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.