Coronavirus Thane Updates: खाजगी रुग्णालयातील कोरोना केंद्रास स्थानिकांचा विरोध; ठामपाच्या आदेशानंतरही केंद्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:17 AM2021-03-27T00:17:00+5:302021-03-27T00:17:34+5:30
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालिका यंत्रणा सतर्क झाली असून, प्रशासनाने खाजगी रुग्णालयाला कोरोना केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली.
ठाणे : दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना केंद्र सुरू करण्याची परवानगी पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यानुसार नितीन कंपनी येथील एका खासगी रुग्णालयाला कोरोना केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्या रुग्णालयाच्या आवारात असलेल्या गृहसंकुलातील नागरिकांनी या केंद्राला विरोध केल्यानंतर पालिकेने या खासगी रुग्णालयाला गुरुवारी कोरोना केंद्र बंद करण्याचे आदेश दिले. पालिका प्रशासनाने आदेश देऊनही रुग्णालय प्रशासनाने कोविड रुग्ण हलविले नसल्याने गृहसंकुलातील रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालिका यंत्रणा सतर्क झाली असून, प्रशासनाने खाजगी रुग्णालयाला कोरोना केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार नितीन कंपनीजवळील एका खाजगी रुग्णालयानेही पालिकेकडून कोरोना केंद्र सुरू करण्यास एक आठवड्यापूर्वी परवानगी घेत, रुग्णांना दाखल करण्यास सुरुवात केली. मात्र, रुग्णालय आवारात असलेल्या एका गृहसंकुल सोसायटीने त्यावर आक्षेप नोंदविला. गृहसंकुलातील नागरिकांनी या रुग्णालयात कोरोना रुग्ण घेऊ नये अशी विनंती रुग्णालय प्रशासनाला केली.
मात्र, पालिकेकडून परवानगी घेऊन या ठिकाणी केंद्र सुरू केल्याचे रुग्णालय प्रशासनाने गृहसंकुलातील समितीला सांगितले. त्यानंतर समितीने पालिका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेत तातडीने या रुग्णालयातील कोरोना केंद्र बंद करण्याची मागणी केली. या मागणीनुसार पालिका प्रशासनाने गुरुवारी या रुग्णालयाला कोरोना केंद्र बंद करण्याचे आदेश दिले. तसेच सद्य:स्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांना तत्काळ पालिकेच्या ग्लोबल कोविड केंद्रावर हलविण्यास सांगितले. मात्र पालिका प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता रुग्णालय प्रशासनाने हे केंद्र सुरूच ठेवल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
- यासंदर्भात गृहसंकुल समितीचे सचिव दर्शन पावसकर म्हणाले की, खासगी रुग्णालय आणि गृहसंकुलाचे प्रवेशद्वार एकच आहे. त्यामुळे या रुग्णालयात कोरोना रुग्ण भरती होण्यास सुरुवात होताच गृहसंकुलातील नागरिकांना बाहेर पडणे अशक्य झाले आहे.
- इमारतीच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथे मजुरांची ये-जा असते. गृहसंकुलात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने राहत असून त्यांच्यासाठी हे धोक्याचे आहे.
- कोरोना केंद्र सुरू करताना सोसायटीचे ना हरकत पत्रदेखील घेण्यात आले नाही. त्यामुळे या रुग्णालयात कोरोना रुग्ण भरती करून घेण्यास गृहसंकुलातील समितीने तीव्र विरोध केला. यासंदर्भात, पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत, खासगी रुग्णालयाची कोरोना केंद्र सुरू करण्याची परवानगी रद्द केल्याची माहिती दिली.