Coronavirus : ठाणेकरांना धास्ती, शहरातील वर्दळ ओसरली, पेट्रोलपंपावर ४० टक्के गर्दी घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 01:26 AM2020-03-16T01:26:04+5:302020-03-16T01:26:33+5:30
सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणाऱ्या ठाणेकरांनी रविवारी कोरोनामुळे घरातच राहणे पसंत केले. एरव्ही सुट्टीच्या दिवशी गजबजलेले कट्टेही ओसाड दिसत होते. दुकानांतही गर्दीला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाणे : कोरोनामुळेठाणे शहरातील गर्दी ओसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एरव्ही गजबजलेल्या ठाणे शहरास वाहतूककोंडीला नेहमीच सामोरे जावे लागते; परंतु दोन दिवसांपासून शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट दिसून येत आहे. दुकानांत अगदी तुरळक गर्दी असून, पेट्रोलपंपवरही ४० टक्के गर्दी ओसरल्याचे पंपमालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणाऱ्या ठाणेकरांनी रविवारी कोरोनामुळे घरातच राहणे पसंत केले. एरव्ही सुट्टीच्या दिवशी गजबजलेले कट्टेही ओसाड दिसत होते. दुकानांतही गर्दीला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील पेट्रोलपंपवरील गर्दीही ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी तर या गर्दीवर प्रचंड परिणाम झाल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. दररोज पाच ते आठ हजार वाहने दररोज पेट्रोलपंपावर येत असतात; परंतु कोरोनामुळे ही गर्दी ४० टक्क्यांनी घटली आहे. याचा परिणाम सोमवारपासून जास्त दिसून येईल, असे तीन पेट्रोल पंपचे राजू मुंदडा यांनी सांगितले.
कल्याणच्या रुग्णाची प्रकृती स्थिर, ‘कस्तुरबा’मध्ये उपचार सुरू
कल्याण : मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात शनिवारी दाखल झालेल्या कोरोनाबाधित चार रुग्णांपैकी एक जण कल्याणचा होता. मात्र, त्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे केडीएमसीने रविवारी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.कल्याणचा हा रुग्ण ६ मार्चला परदेशातून परतला होता. त्यावेळी त्यास कोणताही त्रास जाणवत नव्हता. परंतु, ११ मार्चला रुग्णास त्रास जाणवू लागला.
१२ मार्च रोजी हा रुग्ण स्वत: केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आला होता. तेथील डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. कस्तुरबा रुग्णालयाने तपासणी केली असता त्याचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केडीएमसीने दिली आहे.
दरम्यान, रुग्ण राहत असलेल्या परिसरात सर्वेक्षण करण्यासाठी १२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. २० दिवस पथक सर्वेक्षण करणार आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्याकरिता सावधगिरी बाळगा. लक्षणे दिसल्यास त्वरित कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे.
जि.प.च्या शाळांना सुटी नसल्यामुळे तीव्र संताप
ठाणे : कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांना शालेय शिक्षण विभागाने सुटी जाहीर केली. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भाग शहरांच्या जवळ आहे. असे असताना जिल्हा परिषदांच्या शाळांचा सुटीच्या नियोजनात समावेश न केल्याने गावखेड्यांमध्ये नाराजी आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अपर आयुक्तांसह उच्च व तंत्र शिक्षण, व्यवसाय व प्रशिक्षण आणि शालेय शिक्षण संचालक आदींनी राज्यभरातील कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी घोषित केली आहे. यामध्ये महापालिका, नगरपालिकांच्या शाळांचादेखील समावेश आहे. मात्र, जिल्हा परिषदांच्या शाळांचा या सुटीच्या नियोजनात समावेश नाही.
कोरोनामुळे आइस्क्रीमचे होतेय पाणी, धंद्यावर ३० टक्के परिणाम
च्ठाणे : जेवण झाल्यावर खवय्यांना आइस्क्र ीम हवीच असते. यातूनच शहरी भागात आइस्क्रीम पार्लरची संकल्पना नावारूपाला आली. या पार्लरमध्ये नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते. मात्र, ही गर्दी आता कोरोनामुळे कमी झाली आहे.
च्ठाण्यात आइस्क्रीमच्या धंद्यावर ३० टक्के परिणाम झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, खवय्यांची पावलेही कळत-नकळत पार्लरकडे वळतात. मात्र, ही पावले कोरोनामुळे काही अंतरावर येऊन थांबत आहेत.
होळीनंतर उष्णता वाढते. त्यामुळे खवय्यांचा कल या काळात आइस्क्रीमकडे जास्त असतो. पण, कोरोनामुळे त्यांनी आइस्क्रीमकडे पाठ फिरवली आहे. धंद्यावर ३० टक्क्यांनी परिणाम झाला आहे.
- राजेश जाधव,
आइस्क्रीम पार्लरचे मालक
कोरोनाग्रस्त नागरिकांची संख्या राज्यात वाढत आहे. याची लक्षणे ही सर्दी, खोकला, ताप यासारखी असल्याने लोक थंडगार आइस्क्रीम खाणे टाळत आहेत.
- सुशांत चव्हाण, खवय्या