Coronavirus : ब्रेक द चेनच्या तिसऱ्या स्तरातील र्निबधात ठाणे जिल्ह्यातील गावपाड्यांबरोबर आता शहारांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 05:54 PM2021-06-26T17:54:54+5:302021-06-26T18:00:03+5:30
Coronavirus Break The Chain : तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले. मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार.
ठाणे : संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आणि काही ठिकाणी आढळून आलेल्या डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवे आदेश जारी केले आहे. या आदेशास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांप्रामाणेच शहरांमध्येही आता कोरोनाच्या ब्रेक द चेनच्या तिसऱ्या स्तरातील निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील गावपाडे आधीच या तिसऱ्या स्तराचे निर्बंध पाळत आहे. मात्र सोमवारपासून ठाण्यासह कल्याण-डोंबिवली (केडीएमसी) आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रलाही तिसऱ्या स्तरांच्या निर्बंधांचे पालन सोमवारपासून कटाकक्षाने करावे लागणार आहे. या तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले आहेत.
ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले आहेत. त्यात जिल्ह्यातील ठाणे मनपासह केडीएमसी नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा कोरोना प्रतिबंधात्मक नियमातील तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे राज्य शासनाने सर्व राज्यभर स्तर ३ चे निर्बंध लागू केले आहेत. हा आदेश २८ जूनपासून पुढील आदेशार्पयत अंमलात राहणार आहे. यामुळे आता गांवखेड्यांप्रमाणोच शहरांमध्येही सर्व व्यवहार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी ५ नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली आहेत.
मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच
याशिवाय या तिसऱ्या स्तराचे निर्बंध मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील. उपहारगृहे पूर्वीप्रमाणो मात्र क्षमतेच्या ५० टक्के सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील. सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सकाळी बाहेर फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. खाजगी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. सरकारी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार ५० टक्के क्षमता वापरता येईल. त्यामुळे आता ठाणे शहरातही जिल्ह्यातील गावपाड्यांप्रमाणेच निर्बंध लागू राहणार आहेत. तर मिरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर आदी महापालिका, अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदा, शहापूर, मुरबाड नगरपंचायती आणि पाच तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राचे निर्बंध जैसे थे असे राहतील.