Coronavirus : पोलीस बंदोबस्तात घेतला विलगीकरण कक्षाचा ताबा, २४० खाटांची होणार सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 02:34 AM2020-03-19T02:34:05+5:302020-03-19T02:34:26+5:30
१२ मजल्यांच्या या इमारतीमध्ये २४० खाटांची सुविधा असून सध्या ४० खाटांची सोय केली आहे.
ठाणे - कासारवडवली येथील बीएसयूूपीच्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यास नागरिकांच्या असलेल्या विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तात तो सुरू केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. १२ मजल्यांच्या या इमारतीमध्ये २४० खाटांची सुविधा असून सध्या ४० खाटांची सोय केली आहे. यात तळमजल्यावर वैद्यकीय कंट्रोल रूमदेखील तयार केली असून या ठिकाणी २४ तास डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. यापूर्वी श्रीनगर परिसरात अशा प्रकारचा कक्ष सुरू करण्यास विरोध झाला होता.
सुरु वातीला ठाण्यातील श्रीनगर येथे सुविधा भूखंडाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या पाच मजली इमारतीमध्ये २५ खाटांच्या विलगीकरण कक्षाला विरोध झाला होता. त्यानंतर, कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीमध्ये तो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या इमारतीमध्ये कक्ष तयार करण्यासाठी खाटा आणि इतर सामान सोमवारी सकाळी आणायला सुरुवात केल्यावर या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. त्यांनी खाटा बाहेरदेखील काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा कक्ष या ठिकाणी सुरू करणार नसल्याचे लेखी आश्वासन मिळावे, यासाठी हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सह्यांचे निवेदन ठाणे महापालिकेला दिले होते. मात्र, मंगळवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात तो चालू करण्याचे काम सुरू केले.
१२ माळ्यांची इमारत
या ठिकाणी १२ मजल्यांची इमारत असून २४० फ्लॅट या ठिकाणी असल्याने गर्दी वाढल्यास २४० खाटांची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करता येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या या ठिकणी ४० खाटांची सोय केली आहे. या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर दोन फ्लॅट उपलब्ध असल्याने एका फ्लॅटमध्ये दोघांना स्वतंत्र ठेवण्याची सुविधा आहे. आता पालिकेने याठिकाणी प्रयत्न सुरू केले असले, तरी नागरिक त्याला साथ देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.