Coronavirus: उल्हासनगरात ऐन लॉकडाऊन काळात वाहतूक कोंडी; मार्केट गर्दीने फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 PM2021-04-30T16:28:58+5:302021-04-30T16:29:21+5:30
शहरातील दुकानाचे शटर बाहेरून बंद तर आतून दुकाने सुरू असल्याची टीका होत आहे. यातूनच मार्केट मध्ये नागरिक गर्दी करीत असल्याचे बोलले जात आहे
सदानंद नाईक
उल्हासनगर : ऐन कोरोना काळातील संचारबंदी व लॉकडाऊन मध्ये शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. नागरिक बिनधास्त घराबाहेर पडत असल्याने, रस्ते व मार्केट गर्दीची ठिकाणे बनली असून पोलीस दादाही गर्दीला हैराण झाले.
उल्हासनगरात शेजारील शहरा पेक्षा कोरोनाची संख्या कमी असलीतर, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनासह पोलीस करीत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. अत्यावश्यक दुकानाचा अपवाद वगळता इतर दुकाने बंद असताना सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान नागरिकांची मार्केट मध्ये मोठी गर्दी आहे. यामागील कारण महापालिका व पोलिसांनी वेळीच सोडविणे गरजेचे आहे. नाहीतर ही गर्दी कोरोना प्रदूर्भावाची मुख्य कारण होणार आहे. शहरातील बहुतांश मुख्य मार्केट मध्ये नागरीक गर्दी करीत असून वाहनांची संख्या मोठी आहे. वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. पोलीस व महापालिकेचे तैनात कर्मचारी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अटकाव करीत नसल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली.
शहरातील दुकानाचे शटर बाहेरून बंद तर आतून दुकाने सुरू असल्याची टीका होत आहे. यातूनच मार्केट मध्ये नागरिक गर्दी करीत असल्याचे बोलले जात आहे. कपडे, चपला, यांच्यासह इतर दुकाने सकाळी सुरू ठेवत असून पोलीस व महापालिकेने बघ्याची भूमिका न वठविता, वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे. नाहीतर गेल्या वर्षी प्रमाणे कोरोना रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात शटर बंद करून दुकाने सुरू ठेवल्या प्रकरणी महापालिकेने गुन्हे दाखल केली. कॅम्प नं-५ येथील मुख्य मार्केट, कॅम्प नं-४ येथील मुख्य मार्केटसह उल्हासनगर रेल्वे स्टेशन ते शिवाजी चॉक मार्केट परिसर, शहाड ते गोलमैदान, खेमानी आदी परिसरात नागरिकांची गर्दी असून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे.
भाजी मार्केट मध्येही गर्दी
महापालिका भाजी मंडईसह रस्त्यावर थाटलेल्या भाजी मार्केट मध्ये नागरिक खरेदीसाठी एकच गर्दी करीत आहेत. सोशल डिस्टन्सचा केंव्हाच फज्जा उडाला असून गर्दीचे ठिकाणे कोरोना संसर्गाची ठिकाणे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी अत्यावशक्य कामाशिवाय घरा बाहेर पडू नये. असे आवाहन महापालिकेला वारंवार करावी लागत असून नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.