coronavirus: महिलांना ऊठबशा काढायला लावणे पोलीस अधिकाऱ्याला भोवले; तडकाफडकी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 03:50 AM2020-05-15T03:50:49+5:302020-05-15T03:51:02+5:30
महिलांच्या शिक्षेची चित्रफीत बनवून ती सोशल मीडियावर प्रसारित करणे, एका पोलीस अधिकाºयाला चांगलेच भोवले आहे.
पालघर : लॉकडाउनदरम्यान कारवाई करताना पोलिसांनी नागरिकांना ऊठबशा काढण्याच्या शिक्षा करू नयेत, या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि महिलांच्या शिक्षेची चित्रफीत बनवून ती सोशल मीडियावर प्रसारित करणे, एका पोलीस अधिकाºयाला चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांची जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी सातपाटी खाडीत शिंपल्या पकडण्यासाठी गेलेल्या गरीब मच्छीमार महिला व पुरुषांना खाडीच्या पाण्यातून बाहेर बोलावत ऊठबशा काढण्याची शिक्षा सुनावली होती. सर्वच स्तरांवरून दबाव वाढून कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. यामुळे पोलीस अधीक्षकांनी सावंत यांची बदली केली. या घटनेची चित्रफीत सोशल मीडियावरून प्रसारित करणाºया व्यक्तीचा शोध पोलीस घेत असून त्याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक हे करीत आहेत. तक्रारी आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून याप्रकरणी कारवाई केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली.