CoronaVirus News: कल्याणमध्ये उपचाराअभावी दोघांचा मृत्यू; यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:50 AM2020-06-20T00:50:04+5:302020-06-20T00:50:14+5:30

रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने हाल

CoronaVirus Two dies due to lack of treatment in Kalyan | CoronaVirus News: कल्याणमध्ये उपचाराअभावी दोघांचा मृत्यू; यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

CoronaVirus News: कल्याणमध्ये उपचाराअभावी दोघांचा मृत्यू; यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Next

कल्याण : कोरोनाच्या रुग्णांची संख्या कल्याण-डोंबिवलीत वाढत असून, केडीएमसीने त्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला आहे. असे असतानाही उपचारांअभावी अशोक पूर्ववंशी आणि जर्नादन डोळस यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत प्रशासनाकडे विचारणा करूनही त्यांनी खुलासा केलेला नाही.

अशोक पूर्ववंशी (४३, रा. शिवाजीनगर) यांना ताप आल्याने डॉक्टरांनी त्यांना रक्तचाचणीचा सल्ला दिला. त्यात त्यांना टायफॉइड झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना आधी कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांनी २,८०० रुपये मोजून ती चाचणी केली. मात्र, त्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना होलिक्रॉस कोविड रुग्णालयात दाखल केले. रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना नेले असता तेथे आॅक्सिजनची सुविधा नसल्याने त्यांना कळवा रुग्णालय अथवा केईएम रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यात वेळ गेल्याने अशोक यांचा रुग्णालयासमोर मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या पत्नीचे भाऊ सुरेंद्र सिंग यांनी दिली.

अशोक यांना पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. ते नवी मुंबईतील खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब निराधार झाले आहे. अशोक यांच्या मृत्यूमुळे त्यांचे भाऊ आलोक यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. अलोक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सिंग म्हणाले.

जर्नादन डोळस (५७, रा. वालधुनी परिसर) यांचाही उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. डोळस यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी नेले असता तेथेही कोरोनाची चाचणी करा, असे सांगण्यात आले. १५ जूनला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, रिपोर्ट येण्याआधीच त्यांना त्रास होऊ लागला. शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना उपचारासाठी बेड मिळाला नाही. रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांचा मुलगा राहुल याने बरीच धावपळ केली.

मुलगा, शेजारी क्वारंटाइन : यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते उदय रसाळ यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मेसेज पाठवला होता. मात्र, त्याला प्रत्युत्तर मिळाले नाही. दरम्यान, डोळस यांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला व शेजाऱ्यांना आता क्वारंटाइन केले आहे.

Web Title: CoronaVirus Two dies due to lack of treatment in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.