coronavirus : मीरा भाईंदरमधील दोघेजण कस्तुरबा रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 01:55 PM2020-03-25T13:55:06+5:302020-03-25T13:55:16+5:30
परदेशातुन शहरात आलेल्यांची संख्या 434, होम कॉरेन्टाईन दाम्पत्य व तरुणा वरुन लोकांचा गोंधळ
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये होम कॉरेन्टाईन असलेल्या घोडबंदर येथील एका दाम्पत्यावरुन लोकांनी नाहक गोंधळ घातला. तर पेणकरपाडय़ात परदेशातुन आलेला तरुण बाहेर पडत असल्याने लोकं संतापले. त्यातही उगाच गैरसमजुती मधुन भिती बाळगण्या ऐवजी लोकांनी समजुतदापरणा व माणुसकी दाखवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान परदेशातुन आलेल्या नागरिकांची संख्या 434 इतकी झालेली असुन त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. तर दोघे जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल असुन त्यांचा अहवाल अजुन कळु शकलेला नाही.
घोडबंदर गावातील रेतीबंदर येथे एका खोलीत एक परदेशातुन आलेले होम कोरेन्टाईन झालेले दाम्पत्य रहात आहे. आजुबाजुच्या झोपडपट्टीतील लोकांनी आज मंगळवारी त्यावरुन गोंधळ घालत जमाव जमला व त्या दाम्पत्यास हुसकावुन लावण्याची मागणी चालवली. सदर प्रकार कळताच पालिका व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. माजी उपमहापौर चंद्रकांत वैती तेथे पोहचले. लोकांची भिती नाहक असुन त्यांना समजुत काढून गर्दी हटवण्यात आली. नंतर त्या दाम्पत्याची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती. त्यांना पालिकेच्या न्यु गोल्डन नेस्ट येथील अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
पेणकरपाडय़ात देखील परदेशातुन आलेला एक तरुण दोन तीन वेळा घरा बाहेर पडल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. सदर तरुणास कोरोनाची लागण नसली तरी चाळ असल्याने स्वच्छतागृह सार्वजनिक वापरावे लागते. दरम्यान पोलीस व पालिका घटनास्थळी दाखल झाली. पालिकेने तरुणाची तपासणी केली आहे. सोमवारी भाईंदर पुर्वेला गोडदेवच्या शेवंते चाळी समोरील होम कॉरेन्टाईन असुनही बाहेर फिरणाराया तरुणावर नवघर पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.
परदेशातुन मीरा भाईंदर मध्ये आलेल्या नागरिकांची संख्या आता 434 इतकी झालेली आहे. यातील 97 जणांनी 14 दिवसांचा वेगळे राहण्याचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. 337 लोकं महापालिकेच्या देखरेखी खाली आहेत. त्यातील 47 जणांना पालिकेच्या अलगीकरण केंद्रात दाखल केले असुन उर्वरीतांना घरीच कॉरेन्टाईन केले आहे. संशयीत 10 पैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट अहवाल आले असुन दोघांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचा अहवाल अजुन समजु शकलेला नाही.