CoronaVirus भाईंदरमध्ये कोरोनाचे आणखी दोन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:14 PM2020-05-06T22:14:09+5:302020-05-06T22:14:16+5:30
दिवसभरात 11 रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 125 इतकी आहे. अजून 51 जणांचा चाचणी अहवाल यायचा आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर मध्ये दिवसभरात कोरोनाचे आणखी दोन बळी गेले असून एकूण कोरोना मुळे मरण पावलेल्यांची संख्या 7 झाली आहे . शहरात नव्याने 6 कोरोना रुग्ण सापडले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 196 झाली आहे.
भाईंदरच्या जेसलपार्क भागात राहणारे 70 वर्षीय वृद्ध इसमाचा आज पहाटे कोरोना मुळे भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मृत्यू झाला . ते जेसलपार्कचे राहणारे असले तरी धारावी येथील त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी अडकले होते. तेथून ते भाईंदरला आले असता त्यांना जोशी रुग्णालयात दाखल केले होते . भाईंदरच्या न्यू गोल्डन नेस्ट भागात राहणारे 54 वर्षांच्या इसमाचा देखील जोशी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ते बेस्ट मध्ये काम करणारे होते .
पालिकेने बुधवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार दिवसभरात कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले आहेत . त्यात भाईंदर पूर्वेच्या आनंद नगर भागातील भाजी विक्रेता आहे. भाईंदरच्या लोधा वसाहत, जेपी ठाकूर मार्ग, शिवसेना गल्ली तर मीरारोडच्या गीता नगर फेस 2, करुणा रुग्णालय समोर हे नवीन रुग्ण सापडले आहेत. यात मुंबईतील रुग्णालयाची परिचारिका, वोर्डबॉय व देखभाल दुरुस्ती विभागातील कर्मचारी आहे.
दिवसभरात 11 रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 125 इतकी आहे. अजून 51 जणांचा चाचणी अहवाल यायचा आहे .