CoronaVirus: कल्याण-डोंबिवलीत दोन नवे रुग्ण सापडले; कोरोनाग्रस्तांची संख्या 21वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 05:00 PM2020-04-03T17:00:58+5:302020-04-03T17:01:26+5:30
आज पुन्हा दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाचे आणखीन दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या 21 झाली आहे. काल गुरुवारी पाच नवे रुग्ण आढळून आले होते. आज पुन्हा दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
आज आढळून आलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण हा कल्याण पश्चिमेतील आहे. दुसरा रुग्ण हा डोंबिवली पूर्वेतील आहे. कालच्या पाच रुग्णांपैकी चार रुग्ण हे डोंबिवली पूर्व भागातील आहेत. एक रुग्ण हा कल्याण पूर्वेतील आहे. डोंबिवलीतील चार रुग्णांपैकी तीन रुग्ण हे डोंबिवलीतील वादग्रस्त हळदी व लग्न सभारंभात हजेरी लावणा-यांच्या संपर्कातील आहेत. एक रुग्ण हा कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाली आहे. दरम्यान कोरोनाची लागण रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच डोंबिवलीत खासगी वाहन बंदी करण्यात आली होती.
त्यापाठोपाठ आज सायंकाळी सहा वाजल्यापासून कल्याण पूर्व व पश्चिमेत सर्वत्र खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकी, तीनचाकी, हलकी, मध्यम वजनाची, प्रवासी रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबेर या खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रत्येक अधिका-याची जबाबदारी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी निश्चित केली आहे. 17 अधिका-यावर ही जबाबदारी सोपविली आहे.