CoronaVirus कल्याणमधील दोन सोसायटी होम क्वारंटाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:37 AM2020-04-05T06:37:04+5:302020-04-05T06:37:11+5:30
एकाच कुटुंबात तीन कोरोना रुग्ण। परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद
- सचिन सागरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : एकाच कुटुंबात तीन कोरोना रुग्ण आढळल्याने चिकणघर परिसरातील दोन सोसायटी शनिवारपासून पूर्णत: बंद केल्या आहेत. त्यामुळे या दोन सोसायट्यांमधील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा झालेला नाही. निर्बंध घातलेल्या परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद केली आहेत.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. डोंबिवलीत अत्यावश्यक सेवेतील वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहने चालविण्यास बंदी आहे. त्यानंतर, शुक्रवारपासून कल्याणमध्येही खासगी वाहनांवर बंदी घालण्यात आली. शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या २४ वर जाऊन पोहोचली. यात पश्चिमेतील चिकणघर परिसरात असलेल्या एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या तिघांचा समावेश आहे. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि केडीएमसीने या सोसायटीसह त्याच्या शेजारील अन्य एक सोसायटी शनिवारी सकाळी सील केली. या दोन्ही सोसायटींमधील रहिवाशांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या दोन्ही सोसायटींमध्ये दोनशे कुटुंबे राहतात. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे, दोन्ही सोसायटींचा परिसर निर्जंतुकीकरण केला, अशी माहिती रहिवाशांनी दिली. ज्या इमारतीमध्ये हे रुग्ण राहायला आहेत तेथील रहिवाशांना बाहेर न पडण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. जर सोसायटीच्या बाहेर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी उद्घोषणाही करण्यात आली आहे.
सुरक्षारक्षक वस्तू पोहोचवणार
जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असल्यास सोसायटीच्या सचिवाला याबाबतची माहिती द्यायची आहे. त्यानंतर, या वस्तू सुरक्षारक्षकामार्फत संबंधित रहिवाशांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती रहिवासी चारुदत्त बोरोले यांनी दिली.